मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या ईशान किशन, शुबमन गिल, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके केलीत. यामधील ईशान किशन याने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक केलं आहे. छोटा पॅकेट बडा धमाका असलेल्या खेळाडूने मोठा इतिहास रचला असून दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये तो सामील झाला आहे.
वन डे मालिकेमधील तिन्ही सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा ईशान किशन एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी करणारा ईशान किशन दुसरा विकेटकीपर ठरला असून याआधी महेंद्र सिंह धोनीच्या नावावर हा पराक्रम आहे. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेमध्ये धोनीनेही तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकवली होतीत. एकदिवसीय मालिकेमध्ये अशी कामगिरी करणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे.
1982 ला कृष्णम्माचारी श्रीकांत, 1985 मध्ये दिलीप वेंगसरकर, 1993 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांनी एकदिवसीय मालिकेमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याचात पराक्रम केला होता. श्रेयस अय्यरनेही 2020 साली न्यूझीलंडविरूद्ध ही कामगिरी केली होती. या यादीमध्ये आता ईशान किशनचा समावेश आहे.
तिसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शुबमन गिल 85 धावा, ईशान किशान 77 धावा आणि कर्णधार हार्दिक पंड्या नाबाद 70 धावा या तिघांनी दमदार अर्धशतके केलीत. तिघांनी केलेल्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे.
विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.