मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका म्हणजे वर्ल्डकपपूर्वीची परीक्षा असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. या मालिकेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. कारण यातून आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी खेळाडू निवडले जाणार आहेत.भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला वनडे सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्याने सडेतोडपणे आपली भूमिका मांडली आहे. संघातील असे काही खेळाडू आहेत, त्यांना आम्ही काहीच शिकवू शकत नाही. त्यांचा अनुभव दांडगा आहे.
रोहित शर्मा याला पत्रकाराने विराट कोहलीच्या शतकाबाबत प्रश्न विचारला. विराट जेव्हा शतक करत नाही तेव्हा तुझं त्याच्याशी काही बोलणं होतं का? या गुगली टाकलेल्या प्रश्नावर रोहित शर्माने सरळ षटकार ठोकला आणि आपल्या अंदाजात उत्तर दिलं.
“काही खेळाडू अनेक वर्षांपासून खेळत आहे. खोऱ्याने धावा केल्या आहेत. अशात त्यांना काही सांगण्याची गरज नाही. आम्ही फक्त नव्या खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. त्यांना स्वतंत्रपणे खेळण्याची प्रेरणा देण्याबाबत विचार करत असतो. संघात काही खेळाडू असे आहेत की त्यांना शिकवण्याची गरज नाही. बॅट अशी पकडा किंवा इनिंग्स अशी बिल्ड करा. आमचा हेतू फक्त संघातील वातावरण चांगलं ठेवणं आहे. खेळाडूंना चागलं वातावरण मिळणं महत्त्वाचं आहे.”, असं उत्तर रोहित शर्मा याने दिलं.
“वेस्ट इंडिज मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वर्ल्डकपपर्यंत आम्हाला 12 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आम्हाला आता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक खेळाडूला संधी देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. या मालिकेत चांगली कामगिरी केली तर वर्ल्डकपमध्ये संघात निवड होण्याची शक्यता आहे.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन, संजू सॅमसन, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार, शार्दुल ठाकुर, उम्रान मलिक, युझवेंद्र चहल
वेस्ट इंडिजचा संघ : ब्रँडन किंग, किसी कार्टी, रोव्हमॅन पॉवेल, शिम्रॉन हेटमायर, अलिक अथान्झे, कायल मेयर्स, रोमारियो शेपर्ड, शाय होप (कर्णधार), अल्झारी जोसेफ, डोमिनिक ड्रेक्स, गुडाकेश मोटी, जायदेन सील्स्, केविन सिनक्लेयर, ओशेन थॉमस, यान्निक करियाह