मुंबई : वर्ल्डकप 2023 च्या दृष्टीकोनातून भारताला प्रत्येक वनडे मालिका आता महत्त्वाची आहे. शितावरून भाताची परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच वर्ल्डकप संघात योग्य खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. त्या दृष्टीने भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्यात धरतीत लोळवून सुरुवात केली आहे. या सामन्यात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली. दुसरीकडे, प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला जागा न मिळाल्याने चर्चा रंगली आहे. त्यात सूर्यकुमार यादव हा संजू सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरल्याने चर्चांना मोकळी वाट मिळाली. सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी का घातली असावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर काही जण त्याला ट्रोल देखील करत आहेत. असं असताना सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी घालण्याचं खरं कारण समोर आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, सूर्यकुमार यादव याला त्याच्या साइजची जर्सी मिळाली नव्हती. सूर्यकुमार यादव लार्ज साईजची जर्सी परिधान करतो. पण त्याला एक साईज छोटी जर्सी मिळाली. सूर्यकुमार यादवने याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केली. मात्र सामन्यापूर्वी जर्सी उपलब्ध नसल्याने संजू सॅमसनची जर्सी घालून सूर्यकुमार यादव मैदानात उतरला.
पुढच्या सामन्यातही सूर्यकुमार यादव हा संजू सॅमसनची जर्सी घालूनच मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाने टी 20 मालिकेसाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या हाती सूर्यकुमार आणि अन्य खेळाडूंच्या साईजची जर्सी पाठवली आहे. ही जर्सी दुसऱ्या वनडे नंतरच मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरशिपसाठी एडिडाससोबत करार केला आहे. त्यानंतर नवी जर्सी लाँच करण्यात आली होती. पण त्याच्या साईजबाबत खेळाडूंना अडचण येत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
सूर्यकुमार यादवच्या जर्सीवर सॅमसन लिहिलेले होते आणि 9 क्रमांकही होता.सूर्यकुमार जर्सी घालून मैदानात आला तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सूर्यकुमार यादव याने 25 चेंडूत 19 धावा केल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मोटीच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.