मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या साखळी फेरीला सुरुवात झाली असून भारताची पहिली मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्याच कसोटीत भारताने मोठी आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना हा पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला आहे. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत पाठवल्यानंतर भारताने चांगल्या फलंदाजीचं दर्शन घडवलं. या सामन्यात यशस्वी आणि रोहित शर्मा यांना लय सापडली. पण विराट कोहलीला एका चौकारासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. 80 चेंडू खेळल्यानंतर विराट कोहलीला चौकार मारण्यात यश मिळालं. त्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला.
वेस्ट इंडिजच्या धरतीवर रोहित शर्मा आणि नवोदित यशस्वी जयस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 229 धावांची भागीदारी केली. तसेच कर्णधार रोहित शर्मा 103 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला शुभमन गिल काही खास करू शकला नाही. अवघ्या 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी आणि विराटची जोडी जमली. दुसऱ्या दिवसअखेर दोघांनी नाबाद 72 धावांची भागीदारी केली.
विराट कोहलीने 96 चेंडूत नाबाद 36 धावा करून मैदानात तग धरून आहे. या खेळीत त्याने एकमेक चौकार मारला आहे. 80 चेंडू खेळल्यानंतर त्याला चौकार मारण्यात यश मिळालं. या चौकारानंतर त्याने आनंद व्यक्त केला. इतकंच काय तर पॅव्हेलियनकडे पाहून बॅटही उंचावली. विराट कोहलीने फिरकीपटू वॉरिकनच्या गोलंदाजीवर कव्हर ड्राईव्ह मारत चौकार ठोकला. नॉनस्ट्राईकला असलेल्या यशस्वी जयस्वाल यालाही हसू आवरता आलं नाही. कारण विराट कोहली एका चौकारासाठी झगडत होता आणि अखेर त्याला यश मिळालं.
Calling it a night! That celebration by @imVkohli after hitting his first boundary on the 81st ball.
.
.#INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/4SjNLZCMhx— FanCode (@FanCode) July 13, 2023
विराट कोहली कसोटीत गेल्या काही वर्षात हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटीत विराट कोहलीने शतक ठोकलं होतं. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही काही खास करू शकला नव्हता. पाचव्या स्टंपवरचा चेंडू खेळणं विराटला चांगलंच महागात पडलं आहे. त्या चेंडूवर बहुतांश वेळा विकेट देऊन बसला आहे. सराव सामन्यातही जयदेव उनाडकटने त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 2 बाद 312 धावा केल्या आहेत. भारताकडे आता 162 धावांची आघाडी आहे. कसोटी संपण्यासाठी अजूनही तीन दिवसांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे सामना भारताच्या पारड्यात झुकला असंच म्हणावं लागेल.