IND vs ZIM : “…वाटतं तितकं सोपं नव्हतं”, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार गिलने मन केलं मोकळं

| Updated on: Jul 07, 2024 | 8:27 PM

भारत झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत दोन सामने पार पडले असून 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे पुढच्या तीन सामन्यात दोन्ही संघांची आघाडी घेण्यासाठी धडपड असेल. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक करत विजय मिळवला. यानंतर कर्णधार शुबमन गिल याने मन मोकळं केलं.

IND vs ZIM : ...वाटतं तितकं सोपं नव्हतं, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कर्णधार गिलने मन केलं मोकळं
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 100 धावांनी धुव्वा उडवला. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा दुसऱ्या सामन्यात काढला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिलची विकेट गेल्यानंतर टीम इंडियावर दडपण येईल असं वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान अभिषेक शर्माने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने 47 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 100 केल्या. आंतरराष्ट्रीय सामन्यातलं त्याचं पहिलंच शतक आहे. दुसरीकडे, अभिषेक शर्माला ऋतुराज गायकवाडची साथ लाभली. अभिषेक बाद झाल्यानंतर ऋतुराज आणि रिंकु सिंहने मोर्चा सांभाळला. ऋतुराज गायकवाडने 47 चेंडूत नाबाद 77 धावा, तर रिंकु सिंहने 22 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 2 गडी गमवून 234 धावा केल्या आणि विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं. मात्र झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 134 धावांवर आटोपला. या विजयानंतर शुबमन गिलने कौतुकाचा वर्षाव केला.

शुबमन गिलने सांगितलं की, “खूप आनंदी आहे. जिंकून जबरदस्त कमबॅक केलं आहे. अभिषेक आणि ऋतुराजने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पॉवर प्लेमध्ये करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. काल, दबाव झेलू न शकण्याचं कारण असं होतं की नवखे खेळाडू संघात आहेत. त्यापैकी बरेच जण आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी नवीन आहेत. पहिल्या सामन्यात दडपण असणं सहाजिकच आहे. मात्र दुसऱ्या सामन्यात काय अपेक्षित आहे ते माहिती होतं. अजून तीन सामने शिल्लक आहेत. आता आम्ही पुढच्या सामन्यांचा विचार करत आहोत. पर्याय नसण्यापेक्षा खूप सारे पर्याय असणं कधीही चांगलं.”, असं कर्णधार शुबमन गिल याने सामन्यानंतर सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा