भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी झाली आहे. असं असताना तिसऱ्या सामन्यात वर्ल्डकप संघात असलेले तीन खेळाडू आले आहेत. यात विकेटकीपर संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. त्यामुळे या तिघांना कोणाच्या जागेवर घेणार आणि कोणाला बसवणार हा प्रश्न होता. मात्र हा प्रश्न कर्णधार शुबमन गिल आणि टीम व्यवस्थापनाने सोडवला आहे. वर्ल्डकप विजेत्या संघातील तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग यांना आराम दिला आहे. दुसरीकडे, साई सुदर्शन मायदेशी परतल्याने एक जागा रिकामी झाली होती. तर खलील अहमद हा मुकेश कुमारच्या जागी आला आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा पाहता झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची भंबेरी उडणार यात शंका नाही. नवव्या स्थानापर्यंत फलंदाजी एकदम स्ट्राँग असल्याचं दिसून येत आहे.
रियान परागला पहिल्या सामन्यात स्थान मिळालं होतं. मात्र काही खास करू शकला नव्हता. 3 चेंडूत 2 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याच्या वाटेला फलंदाजी आलीच नाही. अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात खातं न खोलता बाद झाला होता. त्यानंतर जबरदस्त कमबॅक करून शतक ठोकलं. त्यामुळे त्याची जागा जाणं खूपच कठीण होतं. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात फेल ठरलेला रिंकु सिंह देखील दुसऱ्या सामन्यात चमकला होता. त्यामुळे या तिघांना कुठे बसवायचा हा प्रश्न होता. साई सुदर्शन दोन सामन्यांसाठीच संघात होता. त्यामुळे एक जागा रिकामी झाली. तर रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना बसवून दोन जागा करण्यात आल्या. तर मुकेश कुमारला आराम देऊन दुसऱ्या सामन्यात बेंचवर बसवलेल्या खलील अहमदला संधी दिली आहे. खलील अहमद पहिल्या सामन्यात महागडा ठरला होता.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा