भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. झिम्बाब्वेने 20 षटकात 9 गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. शुबमन गिलच्या नेतृत्वात संपूर्ण नवखा संघ मैदानात उतरला आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांना संधी देण्यात आली आहे. हे तिघंही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहेत. मात्र पदार्पणाच्या सामन्यातच अभिषेक शर्मा कमनशिबी ठरला. यशस्वी जयस्वालच्या अनुपस्थितीत शुबमन गिलने डावखुरा साथीदार म्हणून अभिषेक शर्माला संधी दिली. डावं उजवं असं समीकरण गोलंदाजांना त्रासदायक ठरू शकतं. पण हे गणित पहिल्याच सामन्यात फेल ठरलं. शुबमन गिलने अभिषेक शर्माला स्ट्राईक दिली. पण आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याचा दबाव त्याच्यावर स्पष्ट जाणवत होता. ब्रायन बेनेटने त्याला बरोबर आपल्या जाळ्यात गुंतवला. पहिले तीन चेंडू निर्धाव गेल्याने अभिषेकचा संयम सुटला आणि चौथ्या चेंडूवर नको ते करून बसला.
चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्माने अपेक्षेप्रमाणे फटका मारला. पण हा फटका चुकला आणि चेंडू हवेत उडाला. वेलिंग्टन मसाकादझा याने कोणतीच चूक न करता झेल पकडला. त्यामुळे अभिषेक शर्माला खातंही न खोलता तंबूत परतावा लागलं. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खूपच मोठी रांग आहे. अशात मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं असताना अभिषेक शर्मा मोठी चूक करून बसला. आता त्याला आयुष्यभर आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील हा नकोसा प्रसंग आठवणीत राहील. दुसरीकडे, भारताच्या आणखी तीन विकेट झपट बाद झाल्याने संघावरील दडपण वाढलं आहे. रिंकू सिंहलाही आपलं खातं खोलता आलं नाही.
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया,ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे, वेलिंग्टन मसाकडझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद