IND vs ZIM : चुकीला माफी नाही! पहिल्या सामन्यातून शुबमन गिलने घेतला धडा, या खेळाडूला प्लेइंग 11 मधून केलं बाहेर

| Updated on: Jul 07, 2024 | 4:33 PM

टी20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया भानावर आली आहे. झिम्बाब्वेने पहिल्याच सामन्यात भारताला 13 धावांनी धूळ चारली. मात्र आता दुसऱ्या सामन्यात शुबमन गिलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे.

IND vs ZIM : चुकीला माफी नाही! पहिल्या सामन्यातून शुबमन गिलने घेतला धडा, या खेळाडूला प्लेइंग 11 मधून केलं बाहेर
Image Credit source: BCCI
Follow us on

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिलाच सामना जिंकून झिम्बाब्वेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. यामुळे पहिल्याच सामन्यात दुबळ्या झिम्बाब्वेकडून पराभूत झाल्याने शुबमन गिलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतकंच काय तर पराभवानंतर शुबमन गिलने खेळाडूंचं सामन्यात लक्ष केंद्रीत नव्हतं असंही सांगितलं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणार यात शंकाच नव्हती. दुसऱ्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे सर्वकाही घडलं. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि शुबमन गिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्लेइंग 11 मध्ये बदल केल्याचं जाहीर केलं. खलील अहमद ऐवजी संघात साई सुदर्शन याला स्थान दिलं आहे. पहिल्या सामन्यात खलील अहमद महागडा ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर पहिली तडी पडल्याचं दिसत आहे.

खलील अहमदने पहिल्या सामन्यात 3 षटकं टाकली होती आणि 28 धावा दिल्या. तसेच एकही गडी बाद करता आला नाही. त्यात त्याचं फलंदाजीतील योगदानही शून्य होतं. तळाशी खेळताना फलंदाजी करेल की नाही या शंकेने वॉशिंग्टन सुंदर त्याला स्ट्राईक देण्याच्या भानगडीत पडत नव्हता. त्यामुळे खलील अहमदला बसवण्याचा विचार केला असावा. त्याच्या ऐवजी संघात साई सुदर्शनला स्थान दिलं आहे. साई सुदर्शनने शुबमन गिलसोबत गुजरात टायटन्स संघात बराच वेळ घालवला आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून संधी दिली असावी, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. साई सुदर्शनने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

नाणेफेकीनंतर शुबमन गिल म्हणाला की, “आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करून. विकेट कालसारखीच दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करणं चांगलं राहील. खेळपट्टी ड्राय आहे. तसेच सूर्यप्रकाशही प्रखर आहे. फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. खलील ऐवजी सुदर्शनला संघात घेतलं आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा