IND vs ZIM : अभिषेक-ऋतुराजने धू धू धुतला, भारताचं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान

| Updated on: Jul 07, 2024 | 6:11 PM

टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी जबरदस्त कमबॅक केलं आहे. पहिल्या सामन्यात 13 धावांनी पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर नाचक्की झाली होती. पण दुसऱ्या सामन्यात फलंदाजांनी आपला आक्रमक अंदाज दाखवत सर्व कसर भरून काढली. भारताने 20 षटकात 2 गडी गमवून 234 धावा केल्या आणि विजयासाठी 235 धावांचं आव्हान दिलं.

IND vs ZIM : अभिषेक-ऋतुराजने धू धू धुतला, भारताचं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान
Follow us on

भारत आणि झिम्बाब्वे यांच्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत पहिला सामना जिंकून झिम्बाब्वेने 1-0 ने आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने या पराभवाचा वचपा काढला असं म्हणायला हरकत नाही. भारताचे आयपीएल स्टार दुसऱ्या सामन्यात आक्रमक अंदाजात दिसले. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी तर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अभिषेक शर्माने 47 चेंडूत शतक झळकावलं. तर ऋतुराज गायकवाडनेही अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाची धावसंख्या 200 च्या पार नेण्यास मदत केली. भारतीय फलंदाजांसमोर एकाही झिम्बाब्वे गोलंदाजांची चालली नाही. त्यामुळे हतबल होण्याशिवाय पर्याय नव्हता. शुबमन गिलची विकेट गेल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर येईल असं वाटत होतं. मात्र त्याच्या उलट चित्र पाहायला मिळालं. अभिषेक शर्माने आपलं अर्धशतक 33 चेंडूत पूर्ण केलं आणि पुढच्या 50 धावा फक्त 13 चेंडूत करून शतक झळकावलं.

आता झिम्बाब्वेचा संघ भारताने दिलेले इतकं मोठं आव्हान गाठणार का? हा प्रश्न आहे. खरं तरी इतकी मोठी धावसंख्या गाठणं काही शक्य नाही. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघ दडपणाखाली असेल यात शंका नाही. दुसरीकडे, गोलंदाजांना अचूक टप्प्याची आणि बिंधास्तपणे गोलंदाजी करण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी आहे. त्यामुळे टीम इंडिया या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधणार यात शंका नाही. ऋतुराज गायकवाडने 47 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. यात 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर रिंकु सिंहने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा