भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आजपासून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. भारताचा कर्णधान शुबमन गिलने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीचा अंदाज घेऊन शुबमन गिलने हा निर्णय घेतला आहे. या खेळपट्टीमुळे नंतर धावांचा पाठलाग करणं सोपं होईल असं त्याचं मत आहे. खेळपट्टीत विशेष काही बदल होणार नाही असंही त्याने नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर सांगितलं. पण या व्यतिरिक्त क्रीडारसिकांना उत्सुकता होती ती प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार? आता ही उत्सुकता दूर झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यात अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांना संधी मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच जोरावर यांची या संघात निवड झाली होती. आता त्यांना प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
शुबमन गिल हा अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला येणार आहे. उजवं आणि डावं असं ते समीकरण असणार आहे. त्यानंतर ऋतुराज गायकवाड हा फलंदाजीला येईल. रियान पराग चौथ्या, तर रिंकु सिंह पाचव्या स्थानावर फलंदाजीला येईल. विकेटकीपर फलंदाज म्हणून ध्रुव जुरेल संघात आहे. तर गोलंदाजीची धुरा आवेश खान, मुकेश कुमार आणि खलील अहमदच्या खांद्यावर असेल. फिरकीची जबाबदारी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि रवि बिश्नोई यांच्या खांद्यावर असेल. या संघाकडून भारतीय संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत. आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने खेळले तसेच निडरपणे या मालिकेत खेळावं, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद