IND vs ZIM : झिम्बाब्वेकडून मिळालेल्या पराभवानंतर शुबमन गिलचा संयम सुटला, सामन्यानंतर स्पष्टच सांगितलं की..

| Updated on: Jul 06, 2024 | 8:32 PM

झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यात भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या 116 धावा भारताला करता आल्या नाही. झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारणारा शुबमन गिल तिसरा कर्णधार ठरला आहे. या सामन्यानंतर शुबमन गिलने पराभवाचं खापर असं फोडलं.

IND vs ZIM : झिम्बाब्वेकडून मिळालेल्या पराभवानंतर शुबमन गिलचा संयम सुटला, सामन्यानंतर स्पष्टच सांगितलं की..
Follow us on

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिलाच सामना झिम्बाब्वेने जिंकला. भारताला 13 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. झिम्बाब्वेने भारतासमोवर विजयासाठी फक्त 116 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय संघ 19.5 षटकात सर्वबाद 102 धावा करू शकला. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या पदरी निराशा पडली आहे. एकीकडे झिम्बाब्वेचा संघ टी20 वर्ल्डकपमध्ये पात्र ठरू शकला नव्हता. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून फक्त आठवडा उलटला असता भारतीय संघाव अशी वेळ आली आहे. शुबमन गिल हा झिम्बाब्वे विरुद्ध पराभव स्वीकारणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्य रहाणे यांनी टी20 क्रिकेटमध्ये पराभवाचं तोंड पाहिलं होतं. कर्णधार शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकलं नाही. खरं तर 116 ही धावसंख्या फार मोठी नव्हती. 120 चेंडूत 116 धावा करणं टी20 क्रिकेटमध्ये सहज सोपं आहे. पण भारतासारख्या दिग्गज संघाला ते जमलं नाही. या पराभवानंतर शुबमन गिल चांगलाच वैतागलेला दिसला.

कर्णधार शुबमन गिलने सांगितलं की, “आम्ही चांगली गोलंदाजी केली होती. पण आम्ही या सामन्यात नव्हतो असं दिसलं. आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळलो नाही. प्रत्येक जण विचलीत झालेला दिसला. आम्ही खेळपट्टीवर वेळ काढण्याबाबत आणि फलंदाजीचा आनंद घेण्याबद्दल बोललो पण तसं काही झालं नाही. अर्धा टप्प्यात आम्ही 5 विकेट गमवल्या. मी शेवटपर्यंत राहिलो असतो तर ते चांगलं राहिलं असतं. मी आऊट झाल्यानंतर सामना संपुष्टात आला. त्यामुळे खूप निराश झालो. आमच्यासाठी विजयाची आशा होती. पण 115 धावांचा पाठलाग करता दहाव्या क्रमांकाचा फलंदाज उतरतो म्हणजे काहीतरी चुकतंय.” भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा सामना 7 जुलैला होणार आहे. हा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पण या पराभवाने भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरील टी20 वर्ल्डकप विजयाची नशा उतरवली हे मात्र तितकंच खरं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया,ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे, वेलिंग्टन मसाकडझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद