भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 ने आपल्या खिशात घातली आहे. चौथ्या टी20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 10 विकेट्स राखून पराभूत केलं. टीम इंडियाने दुसऱ्यांदा झिम्बाब्वेला 10 विकेटने पराभूत केलं आहे. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल गमवला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. कर्णधार सिकंदर रझाच्या मते मनासारखं झालं होतं. झिम्बाब्वेने 20 षटाकत 7 गडी गमवून 152 धावा केल्या आणि विजयासाठी 153 धावा दिल्या. भारताने या धावा 15.2 षटकात एकही गडी न गमवता पूर्ण केल्या. यासह शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने भागीदारीचा एक विक्रम नोंदवला. यशस्वी जयस्वालने 53 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 93 धावा केल्या. त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. तर शुबमन गिलने 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या. यशस्वी जयस्वालला त्याच्या नाबाद 93 धावांच्या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या पुरस्कारानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मी खरंच फलंदाजीचा आनंद लुटला. मी माझा प्लान वेगवेगळ्या बॉलर्ससाठी मी तशीच योजना आखली होती. चेंडू नवीन असताना बॅटवर येत होता. पण जुना झाला तेव्हा संथ झाला. शुबमन गिलसोबत फलंदाजी करताना मजा आली. सुरुवातीला मी गोलंदाजांना आक्रमकपणे खेळण्यासाठी सज्ज होतो. पण जसा डाव पुढे सरकत गेला तसा मी मोठ्या खेळीचा विचार केला. तसेच शेवटपर्यंत टीकून जिंकवण्यासाठी प्रयत्नात राहीलो.”, असं यशस्वी जयस्वालने सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर सांगितलं.
कर्णधार शुबमन गिलनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. सामन्यानंतर म्हणाला की, ‘धावांचा पाठलाग करण्याबाबत आम्ही चर्चा करत होतो. कारण पहिल्या सामन्यात आम्ही तसं करू शकलो नाहीत. हे चांगलं आहे पण अजूनही काम संपलेलं नाही. अजून एक सामना शिल्लक आहे. हा एक चांगला संघ आहे. माझी कोचशी चर्चा झालेली नाही आणि जर काही बदल असतील तर मी तुम्हाला टॉसवेळी कळवेन.’, असं शुबमन गिल म्हणाला. टीम इंडियाचा मालिकेतील शेवटचा सामना रविवारी म्हणजेच 13 जुलैला होणार आहे. मालिका खिशात घातली तर विजयाने शेवट गोड करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे.