Paris Olympic 2024 : भारताचे 14 ऑलिम्पिक मेडल थोडक्यासाठी हुकले, पॅरिसमध्येही तसंच काहीसं झालं
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकीकडे दुसरे देश धडाधड मेडल पटकावत सुटले आहेत. दुसरीकडे, भारताच्या झोळीत फक्त एकच मेडल पडलं आहे. त्यामुळे खेळाडूंना काय उणीव भासत असेल असा प्रश्न पडला आहे. सोमवारीही शूटिंगमध्ये थोडक्यासाठी पदकाची संधी हुकली. असं भारतासोबत होण्याची 14वी वेळ आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून 117 खेळाडूंचा चमू गेला आहे. तिसरा दिवसापर्यंत भारताच्या पारड्यात फक्त एक मेडल पडलं आहे. स्पर्धा तीव्र आहे यात काही शंका नाही. खेळाडूंनी पदकासाठी दिवसरात्र एक केली आहे. पण स्पर्धेत थोडक्यासाठी जेव्हा यश रुसतं तेव्हा पराभव खेळाडूंच्या जिव्हारी लागतो यात शंका नाही. ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहणं हे कोणत्याही खेळाडूसाठी वेदनादायक असतं. ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज अर्जुन बबूता याच्यासोबत असंच काहीसं झालं. बबूताचं यश 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हुकलं. अवघ्या काही अंतराने कांस्य पदकाने हुलकावणी दिली. यशाच्या जवळ येऊनही ते न मिळणं यासारखं दु:ख नाही. भारताकडून पदकाची अशी संधी जाण्याची ही चौथी वेळ आहे. बबूता हा चौथ्या क्रमांकावर राहिला आणि भारताला 14 व्यांदा यश हुलकावणी देऊन गेलं.
- 1956 मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने कांस्यपदक गमावले होते. कांस्यपदकाच्या लढतीत टीम इंडियाचा बल्गेरियाने 0-3 असा पराभव केला होता.
- 1960 रोम ऑलिम्पिक स्पर्धेत मिल्खा सिंग चौथ्या स्थानावर राहिले. मिल्खा 400 मीटरच्या अंतिम फेरीत पदकाचा दावेदार होते. एका सेकंदाच्या 10 व्या अंतराने कांस्यपदकापासून वंचित राहिले.
- महिला हॉकी संघाने दोनदा चौथे स्थान पटकावले. 1980 मध्ये झालेल्या मॉस्को ऑलिम्पिक आणि 2020 टोक्यो ऑलिम्पिकमध्येही महिला हॉकी संघाला फटका बसला होता.
- 1984 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पीटी उषा चौथ्या स्थानावर राहिली होती. 400 मीटर अडथळा शर्यतीत तिला सेकंदाच्या शंभरावा भागाने संधी हुकली. उषाला रोमानियाच्या क्रिस्टीना कोजोकारूने मागे टाकले.
- 2004 अथेन्स ऑलिम्पिक आणि 2016 रिओ ऑलिंपिकमध्ये टेनिसमध्ये भारताचे पदक हुकले होते. अनुभवी लिएंडर पेस आणि महेश भूपती या जोडीला क्रोएशियाच्या मारियो अँकिक आणि इव्हान ल्युबिचकडून 6-7, 6-4, 14-16 ने पराभव पत्करावा लागला. तर रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झाच्या मिश्र जोडीला कांस्यपदकाच्या लढतीतही निराशेचा सामना करावा लागला.
- लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये नेमबाज जॉयदीप कर्माकरला कांस्यपदक विजेत्यापेक्षा फक्त 1.9 गुण कमी पडले.
- रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने वॉल्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवूनही केवळ .150 गुणांनी कांस्यपदक गमावले. ती 15.066 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.
- बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्राची रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी फार कमी फरकाने हुकली.
- गोल्फर अदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकण्यास मुकली होती. जागतिक क्रमवारीत 200व्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूने जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा केली. मात्र शेवटच्या फेरीत पदरात यश पडलं.