मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडला 100 धावांनी पराभूत केलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे इंग्लंडने भारताला 229 धावांवर रोखलं. त्यामुळे ही धावसंख्या इंग्लंडचा संघ सहज गाठेल असं क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचं फलंदाजीचं पितळ उघड पाडलं. विजयासाठी दिलेल्या 230 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजीची पडझड झाली. एकही फलंदाजी 30 च्या वर धावा करू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची नाकाबंदी करून ठेवली होती. टी20 वर्ल्डकप पराभवाचा एका अर्थी वचपा काढला अशीच चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. त्यामुळे इंग्लंडकडून खऱ्या अर्थाने लगान वसूल झाला अशी सोशल मीडियावर चर्चा आहे.
भारताकडून रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी जबरदस्त खेळी केली. या शिवाय एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर शुबमन गिल 9, श्रेयस अय्यर 4, रवींद्र जडेजा 8, मोहम्मद शमी 1, जसप्रीत बुमराह 16 धावा करून बाद झाले. तर कुलदीप यादव 9 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून डेविड विली याने 3, ख्रिस वोक्स याने 2, अदिल राशीद याने 2 आणि मार्क वूडने 1 गडी बाद केला.
इंग्लंडला भारताने दिलेलं सोपं आव्हान गाठता आलं नाही. जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान आघाडीला येत चांगली सुरुवात केली. त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण जसप्रीत बुमराहने जादू दाखवली. दोन फलंदाजांना झटपट बाद केलं. मलाननंतर जो रूटला आपलं खातंही खोलता आलं नाही. शमीनेही त्यानंतर सलग दोन गडी बाद केले. बेन स्टोक्स आणि बेयरस्टोला बाद केलं. कुलदीप यादवने जोस बटलरला तंबूत पाठवलं. त्यामुळे अवघ्या 54 धावांवर निम्मा संघ तंबूत होता.
मोहम्मद शमीला मोईन अलीच्या रुपाने तिसरं यश मिळालं. तर ख्रिस वोक्सला बाद करत जडेजाने सातवा धक्का दिला. कुलदीप यादव याने 27 धावा करून सेट असलेल्या लिविंगस्टोनला बाद करत आठवा बळी घेतला. मोहम्मद शमी आदिल राशिदला बाद करत सामन्यात चौथा गडी टिपला. तर जसप्रीत बुमराह याने शेवटचा गडी बाद केला आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
उपांत्य फेरीत टीम इंडियाचं स्थान निश्चित झालं आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंडला पराभूत केलं आहे. भारताचा हा सलग सहावा विजय आहे. भारताचा पुढील सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि नेदरलँडशी लढत होणार आहे.