WTC 2025 : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान मालिकेचा टीम इंडियाला फटका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ

| Updated on: Jan 06, 2024 | 9:26 AM

आयसीसी टेस्ट क्रमवारीनंतर आता टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फटका बसला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 3-0 ने पराभूत करत मालिका खिशात घातली. या विजयानंतर विजयी टक्केवारीत फरक पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं आहे.

WTC 2025 : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान मालिकेचा टीम इंडियाला फटका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ
WTC 2025 : पराभव पाकिस्तानचा मात्र नुकसान झालं टीम इंडियाचं, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गुणतालिकेत असा पडला फरक
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी नऊ संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल गुणतालिकेवर परिणाम करतो. भारताने दक्षिण अफ्रिकेतील कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवल्यानंतर फायदा झाला होता. विजयी टक्केवारीत मोठा फरक झाल्याने थेट सहाव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. पण दोन दिवसातच भारताचं पहिलं स्थान ऑस्ट्रेलियाने हिरावून घेतलं आहे.तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 3-0 पराभूत केलं. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयी टक्केवारीत जबरदस्त फायदा झाला आहे. चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आता भारताला गुणतालिकेत पहिलं स्थान मिळावयचं असेल तर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत विजयी टक्केवारी सुधारावी लागेल.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केलं होतं. त्यामुळे विजयी टक्केवारी 100 होती आणि पहिल्या स्थानावर विराजमान होता. पण ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर पहिल्या क्रमांकाची नशा एका झटक्यात उतरली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिल्याने पाकिस्तानची विजयी टक्केवारी झपाट्याने खाली गेली. त्याचा फायदा भारत, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश या संघांना झाला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाच सामन्यांची एशेस मालिका झाली होती. ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती. पण इंग्लंडचं या मालिकेत प्रचंड नुकसान झालं. स्लो ओव्हर रेटमुळे त्यांच्या विजयी टक्केवारीतील गुण कापण्यात आले. त्यामुळे गुणांकनात मोठी घसरण झाली. सध्या गुणतालिकेत 15 विजयी टक्केवारीसह इंग्लंडचा संघ आठव्या स्थानावर आहे. इंग्लंडप्रमाणे भारतालाही स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दोन गुण कापण्यात आले होते.

न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेने दुय्यम संघ निवडला आहे. यावरून गेल्या काही दिवसात क्रीडा जगतात खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू स्टीव्ह वॉ याने या संघ निवडीवर ताशेरे ओढले होते. दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली तर मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता क्रीडाप्रेमींचा नजरा भारत-इंग्लंड आणि न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका मालिकेवर लागून आहेत.