भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या

| Updated on: Sep 21, 2024 | 4:51 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीतील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. पहिला सामना जवळपास भारताच्या बाजूने झुकला आहे. पहिल्या डावात भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. असं असूनही भारताने गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजीला पसंती दिली. नेमकं असं का? त्या मागचं कारण काय? फॉलोऑनचा नियम काय सांगतो? जाणून घ्या.

भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या स्पर्धेतील अंतिम टप्प्याचे सामने सुरु आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून अंतिम सामन्यासाठी प्रमुख दावेदार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना सुरु असून या साखळीत अजून 9 सामने खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्ध 1, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंडविरुद्धची मालिका पुढच्या महिन्यात असणार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. असं असताना भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात घेतलेल्या निर्णयाची खूपच चर्चा रंगली आहे. भारताने पहिल्या डावात आर अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. क्रीडाप्रेमींना वाटलं की भारतीय संघ बांगलादेशला फॉलोऑन देईल. पण तसं झालं नाही भारतीय संघ फलंदाजीसाठी आला. भारताने 4 विकेट गमवून 287 धावा केल्या आणि डाव घोषित केला. बांगलादेशसमोर भारताने विजयासाठी 514 धावांचं आव्हान ठेवलं. असं सर्व असताना भारताने फॉलोऑन का दिला नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घेऊयात.

मेरीलेबॉन क्रिकेट क्लब (एमसीसी) फॉलोऑनचा नियम काय सांगतो?

एमसीसी म्हणजेच मेरीलेबॉन क्रिकेट क्लब क्रिकेटच्या नियमांची बांधणी करतो. यात कलम 14 मध्ये फॉलोऑनचं नियम स्पष्ट केला आहे.

14.1 पहिल्या डावात आघाडी

14.1.1 पाच दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दोन डावांच्या सामन्यात जो संघ प्रथम फलंदाजी करत असेल, त्याच्याकडे किमान 200 धावांची आघाडी असावी.

14.1.2 हाच पर्याय खालीलप्रमाणे किमान आघाडीसह कमी कालावधीच्या दोन डावांच्या सामन्यांमध्ये उपलब्ध असेल:

  • तीन किंवा चार दिवसांच्या सामन्यात 150 धावा
  • दोन दिवसीय सामन्यात 100 धावा
  • एक दिवसीय सामन्यात 75 धावा

14.2 सूचना

कर्णधाराने विरोधी कर्णधार आणि पंचांना हा पर्याय स्वीकारण्याबाबत स्पष्ट सूचित केले पाहिजे. एकदा अधिसूचित केल्यानंतर निर्णय बदलता येत नाही.

भारताकडे 227 धावांची आघाडी तरी फलंदाजीला का आला?

चेन्नईत 33 डिग्री तापमान असून वातावरण उष्ण आणि दमट आहे. यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणं खूपच त्रासदायक आहे. त्यामुळे अशा स्थितीत गोलंदाजांकडून गोलंदाजी करून घेणं कठीण गेलं असतं. आधीच भारताने पहिल्या डावात 47.1 षटकं टाकली होती. जसप्रीत बुमराहने 11 षटकं टाकून 50 धावा देत 1 गडी बाद केला होता. सिराजने 10.1 षटकं टाकून 30 धावा देत 2 गडी बाद केले होते. आकाश दीपने 5 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले होते.रवींद्र जडेजाने 8 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले होते. आर अश्विनने 13 षटकात 29 धावा दिल्या आणि एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे गोलंदाजांची स्थिती पाहून पुन्हा एकदा भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांची दमछाक टाळण्यासाठी फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साखळीत जानेवारी महिन्यापर्यंत भारताचा कसोटी हंगाम आहे. अजून भारताला नऊ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे गोलंदाजांचा फिटनेस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. गोलंदाजांना दुखापत झाली तर भारतीय संघ पुढे अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे पुढच्या सामन्यांसाठी खेळाडूंची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मोहम्मद शमी आधीच दुखापतग्रस्त आहे. त्यात आणखी एखाद्या आघाडीच्या गोलंदाजाला दुखापत झाली तर भारताच्या अडचणी वाढतील.

फॉलोऑन देऊन कसोटी इतिहासात चार पराभवाच्या घटना

14 डिसेंबर 1894 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनी मैदानात कसोटी सामना झाला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने 586 धावा केल्या. त्या बदल्यात इंग्लंडने 325 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाकडे 261 धावांची आघाडी होती. त्यांनी इंग्लंडला फॉलोऑन दिला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 437 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 166 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने 10 धावांनी विजय मिळवला.

16 जुलै 1981 मध्ये लीड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 9 गडी बाद 401 धावा केल्या आणि डाव घोषित केला. इंग्लंडचा संघ 174 धावांवर बाद झाला.ऑस्ट्रेलियाकडे 207 धावांची आघाडी होती म्हणून त्यांनी फॉलोऑन दिला. पण इंग्लंडने 356 धावा केल्या केल्या आणि 129 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाचा संघ 111 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने 18 धावांनी विजय मिळवला.

11 मार्च 2001 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. तेव्हा भारताचा संपूर्ण संघ 171 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडे 274 धावांची आघाडी होती. पण भारताने जबरदस्त कमबॅक केलं. दुसऱ्या डावात 7 गडी बाद 657 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताने 383 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 212 धावाच करू शकला. भारताने हा सामना 171 धावांनी जिंकला.

24 फेब्रुवारी 2023 रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना पार पडला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने 8 गडी बाद 435 धावा केल्या आणि डाव घोषित केला. न्यूझीलंडचा संघ 209 धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडकडे 226 धावांची आघाडी होती. त्यामुळे फॉलोऑनचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडने 483 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 256 धावा करू शकला आणि न्यूझीलंडने 1 धावेने विजय मिळवला.