वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. स्पर्धेतील भारताचा पहिला विजय ठरला आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताला 58 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे नेट रनरेटचं गणितच बिघडलं आहे. त्यामुळे भारताला उर्वरित सामन्यात विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवणं गरजेचं आहे. ही संधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चालून आली होती. पण या संधीचं सोनं करता आलं नाही. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 106 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताने 19 षटकं घेतली. त्यामुळे 2 गुण मिळवूनही भारतीय संघ गुणतालिकेत पाकिस्तानच्या खाली आहे. न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.900 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया 2 गुण आणि +1.908 नेट रनरेटसह दुसऱ्या, पाकिस्तान 2 गुण आणि +0.555 नेट रनरेटसह तिसऱ्या, भारत 2 गुण आणि -1.667 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. आता भारतासमोर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. हे दोन्ही सामने भारतासाठी महत्त्वाचे आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासोबत नेट रनरेटही राखणं गरजेचं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेटचं गणिताबाबत उपकर्णधार स्मृती मंधानाने मत मांडलं.
कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या मानेला दुखापत झाल्याने सामना अर्धवट सोडून जाण्याची वेळ आली. हरमनप्रीतच्या जागेवर आलेल्या सजनाने विजयी फटका मारत संघाला विजय मिळवून दिला. हरमनप्रीतच्या अनुपस्थिति स्मृती मंधानाने संघाची बाजू मांडली. ‘नेट रनरेटबाबत आम्ही विचार करत होतो. पण मी आणि शफाली योग्य सुरुवात करू शकलो नाहीत. पण धावांची पाठलाग करताना आम्हाला आशा ठिकाणी जायचं नव्हतं. पण नेट रनरेट नक्कीच आमच्या डोक्यात होता. आजच्या विजयामुळे आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आम्हाला आशा आहे की या स्पर्धेत आम्ही चांगलं करू’, असं स्मृती मंधाना हीने सांगितलं.
गोलंदाजांचं कौतुक करताना स्मृती मंधाना म्हणाली की, ‘गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे बजावली. आम्ही मैदानात चांगलो होतो. फलंदाजीत चांगली सुरुवात करू शकलो असतो. ‘, असंही तिने सुरुवातीला स्पष्ट केलं. स्मृती मंधानाने हरमनप्रीत कौरच्या दुखापतीबाबतही आपलं मत मांडलं. ‘तिच्या दुखापतीबाबत आताच काही सांगता येणार नाही. डॉक्टर तिची दुखापत पाहात आहेत. आशा आहे की ती ठीक आहे.’ असं तिने पुढे सांगितलं.
दुसरीकडे, पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं. ‘आम्ही फलंदाजीत चांगले नव्हतो. आम्ही किमान 10 ते 15 धाा अधिक करणं गरजेचं होतं. आशा आहे की, पुढच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू.’, असं फतिमा सनाने सांगितलं.