नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित, भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) फॅन्सला नेहमी भारत-पाकिस्तानच्या सामन्याची प्रतीक्षा असते. पण, यावेळी आम्ही थोडं वेगळं सांगत आहोत. कारण, यावेळी भारत आणि पाकिस्तानचा संघ एकत्र नव्हे तर वेगवेगळ्या संघासोबत खेळणार आहे. मोहालीत (Mohali) 20 सप्टेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सीरिजचा शुभारंभ होणार आहे. अकराशे किलोमीटर दूर कराचीमध्येही त्याच वेळी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. आता तुम्ही समजलेच असणार की कशा प्रकारे भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ मैदानात उतरतील. पण, वेगवेगळ्या देशांच्या संघासोबत खेळतील. तरीही या सामन्यांकडे अवघ्या क्रिकेटविश्वसाच्या (Cricket) नजरा असतील. आता या सामन्यात एकीकडे विराट कोहली आणि दुसरीकडे बाबर आझमवर सर्वांच्या नजरा असणार असून अपेक्षाही वाढल्या आहेत.
आशिया चषकात विराटनं जे काही दमदार काम केलं. त्याची चांगलीच चर्चा झाली. यावेळी विराट हा पूर्वीच्या त्याच्या फॉर्ममध्ये परतल्याचंही दिसून आलं. विराटकडून यानंतर आपेक्षाही वाढतच गेल्या. तर दुसरीकडे बाबर आझमसाठी आशिया कप हा फारसा चांगला नाही ठरला. बाबरच्या संघाला या चषकात हार पत्करावी लागली. तर बाबरनं शंभर पेक्षाही कमी धावा काढल्या.
विराट आणि बाबर आझमचा फॉर्म पाहता भारत आणि ऑस्ट्रेलिया तर दुसरीकडे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना चांगलाच रोमांचक ठरू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची टी-20 सीरीजची सुरुवात मोहालीत होईल. ही सीरिज 20 सप्टेंबरपासून सुरु होईल. तर दुसरा सामना हा 23 सप्टेंबरला नागपूर याठिकाणी होईल, तिसरा आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान 7 सामन्यांची टी-20 सीरिज 20 सप्टेंबरपासून सुरू होईल. 2 ऑक्टोबरपर्यंत ही सीरिज चालेल. या सीरिजचे सगळे सामने हे पाकिस्तानच्या दोन शहरांत होतील. कराची आणि लाहोर या ठिकाणी हे सामने होतील. कराचीत पहिले चार सामने, तर लाहोरमध्ये शेवटचे तीन सामने खेळले जातील.