मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा सामना पार पडला. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. आयर्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. कारण भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 301 धावा केल्या आणि विजयासाठी 302 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अवघ्या 30 षटकांमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला. भारताकडून नमन तिवारी, सौमी कुमार पांडे आणि धनुष गौडा यांनी आपल्या भेदक गोलंदाजीने आयर्लंडला बॅकफूटवर ढकललं आणि विजय मिळवला. आता भारताचं सुपर सिक्समधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. भारताने आयर्लंडला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने फायदा झाला आहे. त्यामुळे रनरेट वाढला असून सुपर सिक्सचा मार्ग मोकळा झाला. अ गटात भारताचा शेवटचा सामना युएसएसोबत 28 जानेवारीला आहे.
भारताकडून आदर्श सिंग आणि आर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात आली होती. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी केली. वैयक्तिक 17 धावांवर असताना आदर्श सिंग बाद झाला. त्यानंतर मुशीर खान याने मोर्चा सांभाळला. आर्शिन कुलकर्णी 32 धावा करून तंबूत परतल्यानंतर मुशीरला कर्णधार उदय सहारन याची साथ मिळाली. मुशीर खानने 106 चेंडूत 118 धावा केल्या. तर कर्णधार उदय सहारन याने 75 धावांची खेळी केली. अरावेली अवनिश रावने 22, सचिन धसने 21*, प्रियांशु मोलियाने 2 आणि मुरुगन अभिषेकने 0 धावा केल्या.
भारताकडून नमन तिवारी, सौम्य कुमार पांडे आणि धनुष गौडा यांनी भेदक गोलंदाजी करत आयर्लंडचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. आयर्लंडला फक्त धावा करता आल्या. नमन तिवारीने 4, सौम्य कुमार पांडेने 3, तर मुरुगन अभिषेक, उदय सहारन आणि धनुष गौडाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
आयर्लंड प्लेइंग इलेव्हन | फिलिपस ले रॉक्स (कॅप्टन), जॉर्डन नील, रायन हंटर (विकेटकीपर), कियान हिल्टन, स्कॉट मॅकबेथ, जॉन मॅकनॅली, कार्सन मॅककुलो, ऑलिव्हर रिले, मॅकडारा कॉस्ग्रेव्ह, डॅनियल फोर्किन आणि फिन लुटन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सचिन धस, मुरुगन अभिषेक, धनुष गौडा, सौम्य पांडे आणि नमन तिवारी.