नवी दिल्ली | ऑस्ट्रेलिया लोळवल्यानंतर टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर बांगलादेश विरुद्ध पराभवाने सुरुवात केल्यानंतर अफगाणिस्तान विजयी खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं कडवट आव्हान असणार आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच चुरशीचा होण्याची शक्यता आहे. सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (आधीचं फिरोजशाह कोटला) इथे पार पडणार आहे. सामना दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे.
टीम इंडियाचे वर्ल्ड कपमधील 2 सराव सामने हे पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे टीम इंडियाला विनासराव वर्ल्ड कपच्या रणांगणात उतरावं लागलं. आता नवी दिल्लीत टीम इंडिया-अफगाणिस्तान सामन्यात हवामान कसं असेल, पाऊस खेळ खराब करणार की विनाव्यत्यय सामना पार पडणार, हे आपण जाणून घेऊयात.
क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिल्लीत ढगाळ हवामान असेल. मात्र पावसाची शक्यता नाही. सध्या दिल्लीतल सकाळी ढगांनी आकाश वेढलेलं आहे. हे ढग दिवसभर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र हवामान विभागानुसार, या ढगांचा तसा सामन्यावर परिणाम होणार नाही. ढगाळ वातावरणामुळे गोलंदाजांना मदत मिळू शकते.
दरम्यान दिल्लीत वातावरण गरम असेल. त्यामुळे खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांचा चांगलाच घामटा निघणार आहे. भारतात आलेल्या एकूण 9 संघांना वातावरणामुळे सामन्यादरम्यान उष्माघाताचा त्रास झालाय. दिल्लीत आजही वातावरण गरम असेल. दिवसभरात कमाल तापमान हे 35 डिग्री सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र सामना विनाव्यत्यय होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हिरमोड होण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे.
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.