Explainer : रिंकू सिंह याचा विजयी षटकार का गणला गेला नाही? जाणून घ्या आयसीसीचा नियम

| Updated on: Nov 25, 2023 | 8:16 PM

क्रिकेटमध्ये नियमांवरून अनेकदा गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. वनडे वर्ल्डकपमध्ये टाइम आऊट नियमामुळे बरीच चर्चा रंगली होती. तर इंग्लंडला चौकारांच्या आधारावर विश्वविजेत्या ठरवलं होतं. त्यामुळे आयसीसी नियमांची अनेकदा चर्चा होत असते. आता रिंकू सिंह याने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकार धावांमध्ये गणला न गेल्याने चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

Explainer : रिंकू सिंह याचा विजयी षटकार का गणला गेला नाही? जाणून घ्या आयसीसीचा नियम
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 पराभवानंतर पुन्हा एकदा टीम इंडिया रुळावर येण्यास प्रयत्न करत आहे. सहा महिन्यानंतर होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. गेल्या दहा वर्षात टीम इंडियाने एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे 2024 या वर्षात आणखी एका वर्षाची भर पडणार आहे. त्यामुळे पुढच्या संधीचं सोनं करावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारत ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेकडे याच दृष्टीने पाहिलं जात आहे. टी20 मालिकेत टीम इंडियाकडून नवोदित खेळाडूंना संधी दिली गेली आहे. या खेळाडूंमध्ये टी20 वर्ल्डकपसाठी निवड केली जाणार आहे. असं सर्व चर्चा रंगली असताना एक वेगळा प्रश्न समोर आला आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात एक असा प्रसंग घडला की त्याची चर्चा अजूनही रंगली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत हा विजयी धावा गाठण्यासाठी भारताची धडपड होती. अखेर रिंकू सिंह याने उत्तुंग षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्या संपल्या तरी षटकार मारून रिंकू सिंहने जिंकवून दिल्याचं बोललं जात होतं. पण संघाच्या धावांमध्ये आणि रिंकूलाही त्या षटकाराचा काही विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे असं नेमकं का घडलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना 19.5 षटकापर्यंत टीम इंडियाने 208 धावा करत बरोबरी साधली. एका चेंडूत एक धाव अशी स्थिती होती. स्ट्राईकला रिंकू सिंह उभा होता. त्यामुळे कशीही करून एक धाव व्हावी अशी भारतीय क्रीडाप्रेमींची इच्छा होती. पण रिंकू सिंहच्या डोक्यात काही वेगळंच सुरु होतं. अखेरच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला आणि टीम इंडियाचा विजय झाला. पण हा विजय षटकाराआधीच ठरला होता.

19 षटकांचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 5 गडी बाद 202 धावा होत्या. तर रिंकू सिंह आणि अक्षर पटेल मैदानात होते. विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे शेवटचं षटक सीन एबॉट याच्याकडे सोपवलं गेलं. रिंकू सिंह याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे पाच चेंडू 3 धावा असं समीकरण आलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लेग बाइज धाव आणि अक्षर पटेलला स्ट्राईक मिळाली. चार चेंडूत 2 धावा अशी स्थिती आली. पण नको तेच झालं आणि अक्षर पटेल झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर रवि बिष्णोई रन आऊट झाला. पण स्ट्राईकला रिंकू सिंह आला. 2 चेंडूत दोन धावा अशी स्थिती होती. तेव्हा रिंकूने पाचवा चेंडू मिड विकेटवरून मारला आणि दोन धावांसाठी कॉल दिला. पण दुसरी धाव पूर्ण करेपर्यंत अर्शदीप सिंह धावचीत होत तंबूत परतला.

एका चेंडूत एक धाव अशी स्थिती होती. तर स्ट्राईकला रिंकू सिंह उभा होता. त्यामुळे रिंकू सिंह ठरवल्याप्रमाणे उत्तुंग षटकार ठोकला. पण या षटकाराला नो बॉलमुळे किंमतच उरली नाही. हा षटकार गणला गेला नाही. त्यामुळे संघ आणि रिंकू सिंहला त्याचा काही एक फायदा झाला नाही. याला कारणीभूत ठरला तो आयसीसीचा नियम. नेमका हा नियम काय आहे? ते जाणून घेऊयात

काय सांगतो आयसीसी नियम?

आयसीसी पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम 16.5.1 नुसार, “जसं की 16.1, 16.2 आणि 16.3.1 नियमांतर्गत सामन्याचा निकाल आधीच लागल्यास सामना तिथेच संपतो. त्यानंतर काहीही झालं तर त्याची गणना केली जाणार नाही. क्लॉज 41.17.2 हा पेनल्टी नियम सोडून हा नियम लागू होतो.” म्हणजेच टीम इंडियाला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असती तर तो षटकार गणला गेला असता. पण विजयासाठी एक धाव आवश्यक होती. त्यामुळे फलंदाजाने चेंडू मारण्यापूर्वीच नो बॉलची निकाल आला होता. त्यामुळे सामना तिथेच विजयी होऊन संपला होता. त्यामुळे षटकार गणला गेला नाही.