टीम इंडियाची बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवात झाली. बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला झटपट आऊट केलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर शुबमन गिल याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. मात्र त्यानंतर पंत, यशस्वी आणि केएल हे तिघे आऊट झाल्याने टीम इंडिया 200 धावा करेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र तिथून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या अनुभवी ऑलराउंडर जोडीने टीम इंडियाला सावरलं आणि मजबूत स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली.
सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. अश्विन-जडेजा ही जोडी नाबाद परतली. अश्विनने 112 बॉलमध्ये नॉट आऊट 102 रन्स केल्या. तर जडेजा 117 चेंडूत 86 धावांवर नाबाद आहे. अश्विन-जडेजा दोघांनी सातव्या विकेटसाठी 195 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. करुण नायर आणि रवींद्र जडेजा या दोघांनी इंग्लंड विरुद्ध 2016 साली सातव्या विकेटसाठी 138 रन्सची पार्टनरशीप केली होती. तसेच बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाकडून सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम हा याआधी सचिन तेंडुलकर आणि झहीर खान या दोघांच्या नावावर होता. या दोघांनी 2004 साली 10 व्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली होती. सचिनने याच सामन्यात 248 धावांची खेळी केली होती.
दरम्यान दुसऱ्या दिवशी अश्विन-जडेजाकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तसेच ही जोडी दुसऱ्या दिवशी किती धावा जोडण्यात यशस्वी ठरते? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.