वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतासमोर अडचण निर्माण केली आहे. त्यामुळे आता भारताला आता पुढचे तिन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला लढत द्यायची आहे. त्यामुळे भारतासमोर कठीण आव्हान आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार आहे. भारताचा साखळी फेरीतील दुसरा सामना पाकिस्तानशी होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने आधीच संघावर दडपण येणार आहे. त्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ दुहेरी कात्रीत अडकला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यावेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. याच मैदानात भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. खूपच वाईट पद्धतीने भारताचा पराभव झाला होता. तर पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली होती.
टी20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 12, तर पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड आहे. गेल्या पाच सामन्यांचा निकाल पाहिला तर टीम इंडियाने 4, तर पाकिस्तानने एकच सामना जिंकला आहे. दुसरीकडे, वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 5 वेळा पराभूत करण्यात यश मिळवलं आहे. तर पाकिस्तानने दोन वेळा विजय मिळवला आहे. पण असं असलं तरी भारतासाठी पुढचा प्रत्येक सामना आता जर तरची लढाई आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर हा सामना पाहता येईल. तसेच, डिस्ने-हॉट स्टार ॲपवर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.