मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट या खेळाचं वर्चस्व राहीलं आहे. त्यात दोन्ही पारंपरिक संघ आमनेसामने आले तर सांगायलाच नको. पण गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये मालिका होत नाहीत. दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यामुळे हा सामना म्हणजे करो या मरो सारखाच असतो. कारण मैदानातील खेळाडूंसोबत दोन्ही संघाचे चाहते आक्रमक पाहायला मिळतात.आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आयसीसी 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. या सामन्याच्या वेळापत्रकाबाबत एक माहिती समोर आली आहे. त्यातून हा मोठा खुलासा झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरु होईल आणि फायनल सामना 19 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. 2016 टी 20 वर्ल्डकपनंतर पाकिस्तानचा संघ आता 2023 वर्ल्डकपसाठी भारतात येणार आहे.
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. या वेळापत्रकानुसार मैदानांची नावं देखील जाहीर होतील. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे.
2023 वनडे वर्ल्डकपसाठी नागपूर, बंगळुरु, तिरुवनंतपुरम, मुंबई, दिल्ली, लखनऊ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदुर, बंगळुरु आणि धर्मशाळा येथे सामने होतील. यापैकी सात शहरांमध्ये टीम इंडिया सामने खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख प्रेक्षक बसून हा सामना बघू शकतात.
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचे सामने चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरु येथे ठेवले जाण्याची शक्यता आहे. कोलकात्याच्या बाबतीतही अजून चर्चा सुरु आहे. तर बांगलादेशचे सामने कोलकाता आणि गुवाहाटीत खेळले जाण्याची शक्यता आहे. बांगलादेशी क्रिकेटप्रेमींना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्डकप सामने स्लो पिच आणि स्पिन गोलंदाजांना मदत अशा ठिकाणी ठेवण्याची शिफारस केली आहे. टीम इंडियाने बीसीसीआयला सांगितलं आहे की, स्लो पिच घेण्यामागचं कारण असं की मायदेशात वर्ल्डकपचा पूर्ण फायदा घेता येईल. टीम इंडिया 12 वर्षानंतर भारतात वर्ल्डकप खेळणार आहे.
भारताने 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता त्यानंतर आतापर्यंत एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे चषकांचा दुष्काळ दूर करण्यासाठी संघ मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ यंदा प्रबळ दावेदार मानला जात आहे.