टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन वनडे वर्ल्ड कप फायनलचा वचपा काढला. तर सेमी फायनलमध्ये इंग्लंडलचा धुव्वा उडवत त्यांचा हिशोब क्लिअर केला. टीम इंडियाने कुणालाच सोडलं नाही. टीम इंडियाने सर्वांचा ‘टप्प्यात’ कार्यक्रम केला. टीम इंडियाने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. लो स्कोअरिंग सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अफलातून बॉलिंगच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला. दोन्ही देशांमध्ये ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधामुळे द्विपक्षीय मालिका होत नाहीत. दोन्ही संघ आयसीसी ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेत आमनेसामने असतात. आता टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. पीसीबीने याबाबतची घोषणा केली आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.
पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केलं आहे.मात्र बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाकडून कोणतीही माहिती देण्यात आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन हे 2025 मध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
पीटीआयनुसार, पीसीबीने आयसीसीला 15 मॅचचं ड्राफ्ट शेड्युल दिलं आहे. रिपोर्ट्सनुसार, या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 9 मार्चला अंतिम सामना होणार आहे. तसेच अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे सर्व सामने हे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहेत.
पीसीबीच्या शेड्युलनुसार, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 1 मार्च रोजी होणार आहे. हा सामना लाहोरमध्ये आयोजित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. आयसीसीच्या सदस्याने पीटीआला दिलेल्या माहितीनुसार, “पीसीबीने आयसीसीला 15 सामन्यांचं वेळापत्रक दिलं आहे. त्यानुसार, 7 सामने लाहोर, 3 कराची आणि 5 रावलपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना आणि उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे कराचीत होतील आणि लाहोरमध्ये अंतिम सामना होणार आहे.
दरम्यान आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला गेली नाही. तेव्हाही पाकिस्तानकडे यजमानपद होतं. मात्र टीम इंडियाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात आले. त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की हायब्रिड पद्धतीनुसार तोडगा निघणार, हे लवकरच स्पष्ट होईल.