भारत विरुद्ध झिम्बाब्वे पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. भारताच्या नव्या टी20 पर्वाची येथून सुरुवात होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात नवखा संघ या स्पर्धेत खेळणार आहे. अनेक खेळाडू पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. दुसरीकडे, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केल्याने या जागा भरण्याचं मोठं आव्हान आहे. कारण या दिग्गज खेळाडूंची जागा भरणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यात दोन वर्षांच्या कालावधीत उत्तम संघ बांधण्याचं आव्हान आहे. 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंका या देशात होणार आहे. त्यामुळे मायदेशात खेळताना टीम इंडियावर दडपण येऊ शकतं. त्यामुळे आतापासून मोर्चेबांधणी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यात पहिला सामना जिंकताच टीम इंडिया विक्रम रचणार आहे. सलग 13 सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होणार आहे. पण हरारेची खेळपट्टी कोणासाठी फायदेशीर आहे ते जाणून घेऊयात
हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानातील खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी अनुकूल ठरली आहे. या खेळपट्टीवर चेंडू चांगलाच उसळी घेतो आणि बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना चौकार आणि षटकार मारणं सहज सोपं होतं. पण खेळ जसा पुढे जातो तसा खेळपट्टीची स्थिती बदलते. फिरकीपटूंना या खेळपट्टीवर मदत मिळू शकते. पण त्याचा हवा तितका फायदा होत नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे पहिल्याच सामना दोन्ही संघांकडून मोठी धावसंख्या होऊ शकते. या मैदानात आतापर्यं 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. 29 सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा, तर 20 सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.
टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा.
झिम्बाब्वे संघ : सिकंदर रझा (कर्णधार), डियान मायर्स, इनोसंट कैया, मिल्टन शुम्बा, अंतुम नकवी, ब्रँडन मावुता, ब्रायन बेनेट, फराज अक्रम, जोनाथन कॅम्पबेल,विस्ले मधेवेरे, क्लाइव मडांडे, तदिवानाशे मारुमणी, ब्लेसिंग मुझराबानी, ल्यूक जोंगवेस रिचर्ड एनगारवा, तेंदई चतारा, वेलिंग्टन मसकाडझा.