भारताने जेतेपद मिळवताच पाकिस्तानची पोटदुखी सुरु, जसप्रीत बुमराहबाबत आयसीसीकडे केली अशी मागणी

| Updated on: Jul 01, 2024 | 8:46 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा मानकरी भारतीय संघ ठरला आहे. 17 वर्षानंतर टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयाचं श्रेय जसप्रीत बुमराहला जातं. भेदक गोलंदाजीमुळे विरोधी संघांची दाणादाण उडाली. मात्र पाकिस्तान पत्रकाराला यामुळे पोटदुखी झाली आहे. त्याने आयसीसीकडे बुमराहची ॲक्शन तपासण्याची मागणी केली आहे.

भारताने जेतेपद मिळवताच पाकिस्तानची पोटदुखी सुरु, जसप्रीत बुमराहबाबत आयसीसीकडे केली अशी मागणी
Follow us on

जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडिया एक परिपक्व संघ झाला आहे. आतापर्यंत भारतीय संघ फक्त फलंदाजांचा संघ म्हणून गणला जात होता. मात्र जसप्रीत बुमराहमुळे दोन्ही बाजू व्यवस्थितरित्या सांभाळल्या गेल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला टी20 वर्ल्डकपमध्ये खऱ्या अर्थाने मदत झाली. यासाठीच त्याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानही मिळाला. मात्र जसप्रीत बुमराहचं हे यश पाकिस्तानी पत्रकाराला पचलं नाही. पाकिस्तानी पत्रकाराने जसप्रीत बुमराहच्या ॲक्शनची तपासणी करण्याची मागणी आयससीसीकडे केली आहे. पाकिस्तानी चॅनेल जिओ न्यूजचा पत्रकार आरफा फिरोजने सांगितलं की, “आयसीसी कायम पाकिस्तानी गोलंदाजांच्या ॲक्शनची तपासणी करते. पाकिस्तानच्या कोणत्याही गोलंदाजांने आपली छाप टाकली की टाकली त्याची तपासणीसाठी समिती बसवली जाते. यासाठी जसप्रीत बुमराहच्या ॲक्शनची तपासणी होणं गरजेचं आहे. आयसीसीने पाहिलं पाहीजे की त्याची ॲक्शन नियमांच्या अंतर्गत आहे की नाही. ”

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह गुजरातसाठी खेळत होता. त्याची गोलंदाजीच्या शैलीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. आयपीएलमध्ये डेब्यू करताच जसप्रीत बुमराहचा नावलौकिक आणखी वाढला. मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनेक विजयात त्याचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्याची ही खेळी पाहूनच त्याची निवड टीम इंडियात झाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने अनेक विक्रम या कार्यकाळात नोंदवले. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, बुमराहची बॉलिंग शैली त्याला इतरांपासून वेगळी करते. त्यामुळेच त्याला परफेक्ट अँगल मिळतो. तसेच फलंदाजांना त्याला समजून घेणं कठीण होतं.

जसप्रीत बुमराहने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत वेगवान गोलंदाजाला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळाला आहे. टी20 वर्ल्डकपच्या इतिहासातील एका पर्वात सर्वात इकोनॉमिकल गोलंदाजही ठरला आहे. बुमराहने या स्पर्धेत एकूण 8 सामने खेळला आणि 15 विकेट घेतल्या. तसेच त्याचा इकोनॉमी रेट हा 4.17 इतका होता. यापूर्वी हा विक्रम सुनील नसरीनच्या नावावर होता. बुमराहला यासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलं गेलं.