मुंबई | टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने यासह ऑस्ट्रेलियावर सलग चौथ्यांदा बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-1 ने मालिका जिंकण्याची कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने नागपूर आणि त्यानंतर दिल्लीतील सामन्यात शानदार विजय मिळवला. तर त्यानंतर इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत कमबॅक केलं. मात्र चौथा आणि शेवटचा सामना ड्रॉ राहिल्याने मालिकेचा निकाल 2-1 असा लागला. दरम्यान त्याआधी 2021 मध्ये टीम इंडियाने अशाच पद्धतीने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात ऋषभ पंत याने केलेली खेळी ही निर्णायक ठरली. तसेच वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर मोठी भूमिका निभावली होती. दरम्यान ऑस्ट्रेलियात टीम इंडियाने ज्या कर्णधाराच्या नेतृत्वात ही कामगिरी केली, त्या क्रिकेटरबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने रविवारी रात्री वार्षिक करार जाहीर केला आहे. या करारातून बीसीसीआय आगामी वर्षासाठी खेळाडूंचं मानधन ठरवतं. या वार्षिक करारात एकूण 4 श्रेणीत खेळाडूंची विभागणी केली जाते. खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना या श्रेणीत स्थान दिलं जातं. त्यानुसार बीसीसीआय A+ कॅटेगरीतील खेळाडूंना 7, A श्रेणीतील खेळाडूंना 5, B मधील क्रिकेटपटूंना 3 तर C मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये देतं.
बीसीसीआयने यंदाही हा क्रम असाच कायम ठेवला आहे. मात्र टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलेल्या खेळाडूला या वार्षिक करारातून वगळलंय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करतंय. तसेच या खेळाडूबाबत बीसीसीआयने जाणिवपूर्वक हा निर्णय घेतलाय, असा गंभीर आरोपही नेटकऱ्यांनी केलाय.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारातून मुंबईकर आणि कसोटीत टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलेल्या अंजिक्य रहाणेला याला वगळण्यात आलंय.रहाणे याने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात विराट कोहली याच्या अनुपस्थितीत 2-1 ने मालिका जिंकून दिली होती. त्यानंतर काही सामन्यानंतर रहाणेला कायमचाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेव्हापासून रहाणे टीम इंडियापासून दूर आहे.
दरम्यान दुसऱ्या बाजूला बीसीसीआयच्या या वार्षिक करारात रविंद्र जडेजा याला प्रमोशन मिळालंय. जडेजाचा A मधून A+ श्रेणीत समावेश केला आहे. यामुळे जडेजा याला 7 कोटी रुपये मिळणार आहेत. तर संजू सॅमसन याचा पहिल्यांदाच या करारात समावेश केला गेला आहे.
जडेजा याचा समावेश झाल्याने आता A+ या श्रेणीतील खेळाडूंचा आकडा हा 4 झाला आहे. जडेजा व्यतिरिक्त या श्रेणीत कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांचा समावेश आहे.
तसेच A श्रेणीत हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे खेळाडू आहेत. तर बी कॅटेगरीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.
तर C श्रेणीत सर्वाधिक 11 खेळाडू आहेत. यात उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भरत यांचा समावेश आहे.