मुंबई | सध्या सर्वत्र आयपीएल 16 व्या मोसमाची क्रेझ पाहायला मिळतेय. या 16 व्या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात झाली. आतापर्यंत यशस्वीपणे 8 सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांविना या मोसमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच जिओ सिनेमावर क्रिकेट चाहत्यांना एकूण 12 भाषांमध्ये लाईव्ह क्रिकेट सामन्यासह कमेंट्री ऐकता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. मात्र यादरम्यान एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. यामुळे क्रीडा विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाकडून 3 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलेल्या आणि त्यानंतर पीच क्युरेटरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेल्या मराठमोळ्या सुधीर नाईक यांची वयाच्या 78 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे.
सुधीर नाईक हे काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी आपल्या राहत्या घरी पडले. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्याकडून उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नाईक यांनी 5 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.
सुधीर नाईक यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी इंग्लंड विरुद्ध एडजबस्टन इथे कसोटी पदार्पण केलं होतं. त्यांची कसोटी कारकीर्द ही फारशी मोठी राहिली नाही. त्यांनी 3 कसोटींमधील 6 डावात 141 धावा केल्या. 77 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.
तसेच सुधीर नाईक यांनी 2 एकदिवसीय सामन्यांमध्येही भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 13 जुलै 1974 रोजी वनडे डेब्यू केला. नाईक यांनी पदार्पणाच्या सामन्यात चौकार ठोकत मोठा कारनामा केला. नाईक हे टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौकार मारणारे पहिले फलंदाज ठरले. नाईक यांनी एकूण 2 वनडेंमध्ये 38 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली. सुधीर नाईक यांनी 85 प्रथम श्रेणी सामन्यांमधील 139 डावात 4 हजार 376 धावा केल्या. यामध्ये 7 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश होता. तर 200 नाबाद ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. विशेष बाब म्हणजे त्यांनी रणजी ट्रॉफीत मुंबईचं नेतृत्वही केलं होतं. नाईक यांनी मुंबईला 1970-71 साली रणजी ट्रॉफीत विजयी करुन देण्यात मोठं योगदान दिलं होतं.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही नाईक यांची मैदानाशी असलेली नाळ तुटली नाही. नाईक यांनी त्यानंतर पीच क्युरेटर म्हणून जबाबदारी सांभाळली. नाईक हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे मुख्य पीच क्युरेटर होते. सामन्याला साजेशी खेळपट्टी तयार करण्याची जबाबदारी ही पीच क्युरेटरची असते. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत टीम इंडियाने 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. हा सामना ज्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला, ती खेळपट्टी नाईक यांनी तयार केली होती.
दरम्यान नाईक यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.