मुंबई : क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. भारताच्या युवा खेळाडूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय. मैदानात प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॉलिंगने गार करणाऱ्या खेळाडूने जगाचा निरोप घेतलाय. या युवा खेळाडूचं उपचारादरम्यान निधन झालंय. हिमाचल प्रदेशचा युवा आणि वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्माची वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी प्राणज्योत मावळली आहे. सिद्धार्थने बडोद्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थचे आई-वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य हे विदेशात राहतात. भाऊ कॅनडातून भारतात आल्यानंतर सिद्धार्थ अंतिम संस्कार करण्यात आले.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे सचिव अवनीश परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने बुधवारी कायमचा अलविदा केला. सिद्धार्थवर गेल्या काही दिवसांपासून व्हेटिंलेटरवर उपचार सुरु होते. बडोदा विरुद्धच्या सामन्यात सिद्धार्थ टीममध्ये होता. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थला सामन्याआधी उलटी व्हायला लागली. ज्यामुळे त्याला लघवी करायला त्रास जाणवू लागला. त्यानंतर सिद्धार्थला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर सिद्धार्थची प्रकृती ढासळत गेली. सिद्धार्थच्या निधनाने संपूर्ण हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ दु:खात आहे .”
काही दिवसांपूर्वी आपल्या असलेला सिद्धार्थ आज आपल्यात नाही, ही भावना त्याच्या सहकाऱ्यांच्या मनाला चटका लावणारी आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे सहकारी खेळाडूंना एकच धक्का बसलाय. सिद्धार्थने 20 ते 23 डिसेंबर दरम्यान बंगाल विरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये एकूण 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच युवा खेळाडूच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरलीय. विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून सिद्धार्थच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सिद्धार्थच्या निधनावर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शोक व्यक्त केलाय. “हिमाचल प्रदेशच्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या संघातील सदस्य सिद्धार्थ शर्माच्या निधनाच्या बातमीमुळे मी दु:खात आहे. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांतो देवो. मी शर्मा कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. शर्मा कुटुंबियाला या दु:खातून सावरण्याचं सामर्थ्य मिळो.”, असं ट्विट मुख्यमंत्री सुक्खू यांनी केलंय.
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याकडून श्रद्धांजली
हिमाचल की विजय हजारे ट्रॉफी विजेता क्रिकेट टीम के सदस्य रहे और प्रदेश के स्टार तेज गेंदबाज सिद्धार्थ शर्मा के निधन की अति दुःखद खबर है।
मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वह दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें व
प्रियजनों को इस दारुण दुख सहने की शक्ति प्रदान करें । pic.twitter.com/31rwMswXQX— Sukhvinder Singh Sukhu (@SukhuSukhvinder) January 13, 2023
दरम्यान सिद्धार्थने 6 प्रथम श्रेणी, 6 लिस्ट ए मॅच आणि 1 टी 20 सामन्यात एकूण 33 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच देशांतर्गत स्पर्धेत मानाच्या समजल्या जाणारी रणजी करंडक स्पर्धा हिमाचल प्रदेशने 2021-22 साली जिंकली होती. सिद्धार्थ या विजयी संघाचा सदस्य होता.