मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारतासह, दक्षिण आफ्रिक, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमी फायनलमध्ये गेले आहेत. चारही संघ आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडतील. यंदाच्या स्पर्धेमधून वर्ल्ड कप विनर इंग्लंड, पाकिस्तान या दोन तगड्या संघाना सेमी फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही. पाकिस्तान संघाचा शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. अशातच बाबरच्या समर्थनार्थ कपिल देव यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.
बाबर आझम याने मागील सहा महिन्यांमागे संघाला नंबर वन बनवलं होतं. पण जेव्हा एखादा खेळाडू झिरो होतो त्यावेळी लोकांची त्याच्याविषयीची मत जाणून घेतलीत तर ९९ टक्के लोकं त्याला संघातून ड्रॉप करतील. पण तेच जर एखादा सामान्य खेळाडू शानदार खेळी करून जाईल त्यावेळी सगळे त्यासा सुपरस्टार बोलतात. पण कधीच चालू कामगिरीवरून कोणत्याही खेळाडूचं मूल्यमापन केलं जावू शकत नाही. कारण त्याने आधी कशा प्रकाराची कामगिरी केलीय ती जाणून घेतली पाहिजे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
तो खेळाडू कसा खेळतो, त्याच्यात किती जोश आणि टॅलेंट आहे हे पाहिलं पाहिजे. पहिल्या चेंडूवरही तुम्ही आऊट होऊ शकता. जगात असा कोणताही खेळाडू नाही जो पहिल्या चेंडूवर आऊट होऊ शकत नाही, असं कपिल देवने म्हटलं आहे. कपिल देवने बाबर आझमबाबत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९८३ साली पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवने भारतासाठी 131 कसोटी सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले असून यामधील कसोटीमध्ये 5248 धावा आणि वन डे मध्ये 3783 धावा केल्यात. त्यासोबतच कसोटीमध्ये 434 विकेट आणि वन डे मध्ये 253 विकेट घेतल्या आहेत.