टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. तर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारताचा चांगलाच कस लागणार आहे. मागच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन मालिकेत भारताने विजय मिळवला होता. पण विजय वाटतो तितका सोपा नव्हता. कारण भारतीय खेळाडूंना विदेशी मैदानावर तग धरणं कायमच कठीण गेलं आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सुरु होणार आहे. यावर बीसीसीआयने एक तोडगा काढला आहे. तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेत देशात खेळपट्टी तयार केली आहे. त्यामुळे देशातच तिथल्या वातावरणाची अनुभूती घेत सराव करता येईल. जय शाह यांनी मुंबईत मीडियाशी बोलताना सांगितलं की, बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमीच्या हाय परफॉर्मंस सेंटर बोर्डाचा प्रोजेक्ट होता. हा प्रोजेक्ट जवळपास पूर्ण झाला आहे. पुढच्या महिन्यात याचं उद्घाटन केलं जाईल.
या प्रोजेक्ट अंतर्ग तीन मैदानं तयार केली गेली आहेत. यात 100 खेळपट्ट्या आणि 45 इनडोअर टर्फ तयार केले आहे. या सेंटरमधील खास बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेसारख्या खेळपट्ट्या आहेत. यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना सराव करता येईल. विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी या खेळपट्ट्यांवर सराव करू शकतात. बीसीसीआयला प्रोजेक्टसाठी 2008 मध्ये जमिन मिळाली होती. जय शाह यांच्यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याने याचा वापर केला नाही. बोर्डाकडे पर्याप्त पैसा असूनही नॅशनल क्रिकेट अकादमी चिन्नास्वामी स्टेडियममधून चालवावी लागत होती. भारतीय क्रिकेट संघाला आवश्यक सुविधा तिथे नव्हत्या.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी 2019 मध्ये आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेचा नारळ फोडला. पण करोनामुळे दोन वर्षात काही खास काम झालं नाही. पण 2022 मध्ये जय शाह यांना दुसरा कार्यकाळ मिळाला आणि त्याने हा प्रोजेक्ट मार्गी लावला. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघ या खेळपट्ट्यांवर सराव करू शकतो.