आनंद महिंद्रा यांनी सरफराज खान याच्या वडिलांना दिली मोठी ऑफर, म्हणाले…

| Updated on: Feb 16, 2024 | 2:59 PM

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यातून सरफराज खानने कसोटी संघात एन्ट्री घेतली. पहिल्याच सामन्यात जबरदस्त खेळी करत 62 धावा केल्या. इथपर्यंत पोहोचण्यासाठी सरफराज आणि वडील नौशाद खान यांनी बरीच मेहनत घेतली होती. मैदानात टीम इंडियाची कॅप परिधान केल्यानंतर नौशाद खान यांना अश्रू अनावर झाले. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

आनंद महिंद्रा यांनी सरफराज खान याच्या वडिलांना दिली मोठी ऑफर, म्हणाले...
आनंद महिंद्रा यांनी सरफराजच्या मेहनतीची घेतली दखल, वडील नौशाद खान यांच्याकडे केली अशी विनंती
Follow us on

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातून सरफराज खान याने पदार्पण केले आणि आपली एक छाप सोडली. पहिल्याच सामन्यात सरफराज खान याने 62 धावांची खेळी केली. रनआऊट झाल्याने धावांना ब्रेक लागला पण आपल्या फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सरफराज खान याचा इथपर्यंतचा प्रवास काही साधासोपा नव्हता. गेली अनेक वर्षे संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. पण नशिबात जे काही असतं ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं आणि भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. सरफराजला घडवण्यासाठी वडील नौशाद खान यांनी खूप मेहनत घेतली. रात्रीचा दिवस करून त्याला क्रिकेटचे धडे दिले. आता त्यांच्या या मेहनतीची दखल उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी ट्वीटरवर बीसीसीआयने पोस्ट केलेला व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. तसेच एक पोस्ट लिहित सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

अनिल कुंबले यांच्याकडून सरफराज खान याला डेब्यू कॅप मिळाल्यानंतर वडील नौशाद खान भावुक झाले होते. हा व्हिडीओ पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, ‘कधीच हिम्मत सोडू नका, बस! कठोर मेहनत, साहस आणि धीर..मुलाला प्रेरणा देण्यासाठी वडिलांमध्ये यापेक्षा चांगला गुण कोणता असू शकतो? एक वडील म्हणून एक प्रेरणास्थान असल्याने नौशाद खान यांनी थारची भेट स्वीकारली तर ती माझ्यासाठी गौरवाची आणि सन्मानाची बाब असेल.’

आनंद महिंद्रा यांनी असं ट्वीट करताच या व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. नेटकऱ्यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवलेल्या सौजन्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून कौतुक सोहळा सुरु झाला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा कायम गरजू व्यक्तींना मदतीचा हात पुढे करतात. ट्विटरवर वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करून लक्ष वेधून घेतात. तसेच त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन शिकवतात. त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना दिलेली भेट खरंच अमुल्य आहे.