मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. हार्दिक पंड्याच्या जागी आज सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांनी संधी मिळाली आहे. या वर्षात स्कायला अनेक संधी मिळाल्या मात्र त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. टीम मॅनेटमेंटने त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली आहे त्यामुळे आजच्या सामन्यात तो चमकदार कामगिरी करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सूर्यकुमार यादव याची ताकद आपण टी-२० फॉरमॅटमध्ये पाहिली आहे. एकट्याच्या दमावर त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र वन डे मध्ये सलग तीन सामन्यांमध्ये गोल्डन डक झालेला होता. इतक्यावेळा वन डे मध्ये अपयशी ठरल्यावरही वर्ल्ड कप संघात त्याला स्थान मिळाल्याने निवड समितीवर जोरदार टीकाही झालेली पाहायला मिळाली होती. मात्र आज परत एकदा टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
सूर्याने 2023 मध्ये 14 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेमध्ये सूर्या सलग तीन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत 31 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 28 डावात त्याने 27.78 सरासरीसह 667 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने फक्त दोन अर्धशतके केली असून ७२ त्याचा वन डे मध्ये सर्वाधिक स्कोर आहे.
दरम्यान, टी-२० चा बादशहा आज संघाला गरज पडली तर कशी कामगिरी करतो हे याकडे क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे. मिस्टर ३६० म्हणून सूर्याने आपली क्रिकेट जगतात ओळख केली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट