मुंबई : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमात्र कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय महिला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घतला. दिवसअखेर भारतीय महिला संघाने ७ गडी बाद ४१० धावा केल्या. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसून आली आहे. एका दिवसात ४०० च्या पार धावसंख्या करणारा भारत हा दुसरा संघ ठरला आहे. आता दुसऱ्या दिवशी भारतीय संघ या धावसंख्येत आणखी भर घालेल यात शंका नाही. दीप्ती शर्मा नाबाद ६०, तर पूजा वस्त्राकार ही नाबाद ४ धावांवर खेळत आहे. तर पदार्पणाच्या सामन्यात शुभा सतीश ६९ आणि जेमिमा रॉड्रिग्स हीने ६८ धावांची खेळी केली.
भारताकडून आघाडीला आलेल्या स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या काही खास करू शकल्या नाहीत. स्मृती १७, तर शफाली वर्मा १९ धावा करून तंबूत परतल्या. मात्र त्यानंतर शुभा सतीश आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी मोर्चा सांभाळला. तिसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. शुभा बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतनेही आपला दम दाखवला. ८१ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. दुर्दैवाना धावचीत झाल्याने अर्धशतक एका धावेने हुकलं. मधल्या फळीत यास्तिका भाटिया आणि दीप्ती शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम काढला. यास्तिकाने ६६ धावांची खेळी केली. तर दीप्ती नाबाद ६० धावांवर खेळत आहे.
इंग्लंडनंतर भारतीय संघ २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियासोबत कसोटी सामना खेळणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही कसोटी पार पडणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा कसोटी सामना भारताने सप्टेंबर २०२१ मध्ये खेळला होता. हा सामना ड्रॉ झाला होता.
भारत: स्मृति मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड
इंग्लंड: टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, हीथर नाइट (कर्णधार), नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल