मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील विराट कोहली आणि नवीन उल हक वाद कोणीच विसरू शकत नाही. कारण या वादाने मैदानाच्या चाकोरीबाहेर जाऊन भलतीच परिसीमा गाठली होती. त्यामुळे हा वाद बराच दिवस गाजला.इतकंच काय तर सोशल मीडिया युजर्स काही जरी झालं तरी या दोघांच्या इंस्टास्टोरी चेक करायचे. त्यामुळे बातम्यांना अधिक रंग चढायचा आणि सोशल मीडियावर चर्चांना ऊत यायचा. वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वादावर पडदा पडला आहे. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या युट्यूब चॅनेलवर नवीन उल हकने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. वाद सुरु असताना इंस्टाग्रामवरील गोड आंब्याची पोस्ट नेमकी कशासाठी होती? असा प्रश्न विचारण्यात आला. बऱ्याच महिन्यानंतर नवीन उल हकने या पोस्टबाबत खुलासा केला आहे. वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान ही पोस्ट करण्यात आली होती.
नवीन उल हकने मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामना पाहताना समोर आंबे ठेवल्याचा एक फोटो पोस्ट केला. त्याखाली त्याने गोड आंबे असं लिहिलं होतं.पोस्टमध्ये विराट कोहलीचा कुठेही उल्लेख नव्हता. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर जाणीवपूर्वक ही पोस्ट केल्याचं चाहत्यांना वाटलं. पण यामागे भलतीच कहाणी असल्याचं नवीन उल हकने सांगितलं आहे. आयपीएल 2024 लिलावापूर्वी एलएसजी युट्यूबवर बोलताना त्याने यामागची खरी कहाणी सांगितली.
‘मी धवलभाईंना मला आंबे खायचे असल्याचं सांगितलं. त्या रात्री काही आंबे मिळाले नाहीत. आम्ही गोव्याला गेल्यावर त्यांनी आंबे आणले. मी टीव्ही पाहात आंबे खात होतो. टीव्हीवर मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता. त्याचा विराट कोहलीशी काही संबंध नव्हता. मी गोड आंबे असं लिहिलं आणि प्रत्येकाने त्याचा चुकीचा संदर्भ जोडला. त्यावर मी काहीच बोललो नाही. मला वाटले आंब्याचा सिझन आहे तर लोकांची दुकानंही चालली पाहीजेत.’, असं नवीन ऊल हक म्हणाला.
Who said "sweet mangoes"? 🫣😂
Full interview on YouTube! 💙#LucknowSuperGiants | #LSG | #DurbansSuperGiants | #DSG | pic.twitter.com/SKGzZv4HQ2
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) December 2, 2023
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि नवीन ऊल हक यांनी वाद मिटवला. तसेच हा वाद फक्त मैदानावरचा असल्याचं सांगितलं. त्यामुळे या दोघांमध्ये कोणतंही वैमनस्य नसल्याचं जाहीर झालं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर नवीन ऊल हकने निवृत्ती घेतली आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सने नवीन ऊल हकला आयपीएल 2024 स्पर्धेसाठी संघात कायम ठेवले आहे. लखनऊ संघाने जयदेव उनाडकट, मनन वोहरा, स्वप्निल सिंग, डॅनियल सॅम्स, करण शर्मा, अर्पित गुलेरिया, सूर्यांश शेडगे, करूण नायर या आठ खेळाडूंना रिलीज केली.