IPL Spot Fixing : पोलिसांचा छापा श्रीसंतसह दोन मुली आणि बुकी, दाऊदमुळे फिक्सिंग समोर

| Updated on: May 07, 2024 | 5:35 PM

जगात एक नंबर लीगमध्ये मोडणाऱ्या आयपीएल स्पर्धेला 2013 मध्ये डाग लागला होता. भारताचा वर्ल्ड कप विनर खेळाडू फिक्सिंगच्या जाळ्यात अडकलेला. त्यासोबतच दोन युवा खेळाडूंचाही यामध्ये समावेश होता. फिक्सिंग उघडकीस आली यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद निमित्त ठरला होता. नेमकं काय घडलं होतं जाणून घ्या.

IPL Spot Fixing : पोलिसांचा छापा श्रीसंतसह दोन मुली आणि बुकी, दाऊदमुळे फिक्सिंग समोर
Follow us on

आयपीएल आता जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीग झाली आहे. सर्व देशांचे खेळाडू सहभागी होतात. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंवर पाण्यासारखा पैसा ओतला जातो. युवा खेळाडूंसाठी आयपीएल मोठं स्टेज आहे, फक्त भारतातीलच नाहीतर परदेशी खेळाडूंसाठी आयपीएल टर्निंग पॉईंट ठरते. अनेक खेळाडू ज्यांच्यासाठी आयपीएलमुळे यशाची शिडी ठरली. मात्र या आयपीएलला 2013 साली डाग लागला. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. कारण टीम इंडियाचा वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडू एस. श्रीसंतसह दोन भारतीय खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू होती. पण तुम्हाला माहिती का हे स्पॉट फिक्सिंग कशामुळे समोर आलं होतं? अंडरवर्ल्ड डॉन दाऊदमुळे हा काळाबाजार जगासमोर उघडा पडेलला. नेमकं काय झालं होतं जाणून घ्या.

दाऊदसाठी तपास, समोर  IPL स्पॉट फिक्सिंग

महाराष्ट्रात जानेवारी 2013 ला सीबीआयने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (Maharashtra Control of Organised Crime Act) या कायद्या अंतर्गत 42 लोकांवर चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये अनेक जण पाकिस्तामधील होते. तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि संदीप सँडी हे यादीमधील प्रमुख होते. सीबीआय यांना पकडण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होती. यासाठी सीबीआयने फोन टॅपिंग करण्याचं काम स्पेशल सेलकडे सोपवलं. पाकिस्तानमधील +923332064488 तर दुबईमधील +971561363786 या दोन नंबरचे फ्रेब्रुवारी 2023 पासून फोन टॅपिंग सुरू करण्यात आलं.

अंडरवर्ल्डचं आयपीएल कनेक्शन

दिल्ली पोलिसांनी फोन टॅपिंग सुरु केलं आणि रेकॉर्डिंग ऐकल्यावर आयपीएल आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन समोर आलं. या नंबरवरून अंडरवर्ल्डमधील अश्विन अग्रवाल (टिंकू मंडी) याचं सुनिल भाटिया आणि किरण ढोले या दोन मॅच फिक्सर्ससोबत बोलणं सुरू होतं. संशय वाढत गेला त्यानंतर सुनील भाटिया आणि किरण ढोले याचे फोन टॅप करण्यात आले. या दोघांचं बोलणं ऐकल्यावर राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूचं नाव समोर आलं. हा खेळाडू अजित चंडिला, रणजीपटू फिक्सर्सच्या जाळ्यात अडकला होता. युवा खेळाडू असल्याने अजितबद्दल फार कोणाला माहिती नव्हती. त्यानंतर आणखी कोणते खेळाडू यामध्ये आहेत का हे पाहण्यासाठी सुनील आणि किरण यांचे आणखी फोन कॉल टेप केले. केरळमधली जिजु जनार्धन याचं नाव समोर आलं. फिक्सर असलेल्या जनार्धन याच्या लिंक चेक केल्यावर सर्वांनाच धक्का बसला. कारण टीम इंडियासाठी वर्ल्ड कप खेळलेल्या एस. श्रीसंत याचं नाव समोर आलं.

सिग्नल चुकला, फिक्सर चंडिलावर चिडला

लोधी रोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची माहिती झाल्यावर दिल्ली पोलीस कॉल रेकॉर्डिंग ऐकायला सुरू केलं. पोलीस सबळ पुरावे गोळा करण्यासाठी कामाला लागले. यामध्ये जयपूरच्या मैदानावर 5 मे 2013 ला पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच असते. या सामन्याआधी फिक्सर अमित सिंह हा अजित चंडिलाला फोन करतो. अमित हा अजित याला आपल्या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन द्यायच्या. मॅचमध्ये ठरल्याप्रमाणे अजित चंडिला आपल्या ओव्हरमध्ये 14 रन देतो. मात्र फिक्सर तरीसुद्धा त्याच्यावर रागवतो. कारण अजित चंडिला फिक्सरला कोणताही सिग्नल देत नाही. त्यामुळे पैसे लावायचे की नाही फिक्सर गडबडतो आणि पैसे लावू शकत नाही. दिल्ली पोलीस हे सर्व रेकॉर्ड करून घेत असतात.

श्रीसंतचं नाव ऐकून पोलिसांना बसला धक्का

पुण्याविरूद्धची मॅच झाल्यावर 9 मे 2013 ला चार दिवसांनी राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमधील मॅचमध्ये श्रीसंतचं नाव समोर येतं. या मॅचआधी पोलीस जिजु जनार्धन याला ट्रेस करत होते. पोलिसांनाही धक्का बसतो कारण श्रीसंतसोबत या बुकीचं बोलणं सुरु असतं. या मॅचमध्ये जनार्धन श्रीसंतला सांगतो की, आपल्या स्पेलमधील दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 किंवा त्यापेक्षा जास्त धावा द्यायच्या. रनअप घेतानाही तो थोडा दूरवरून घ्यायचा. आपला रूमाल खाली पाडायचा हा बुकींसाठी सिग्नल होता. पहिल्या मॅचमध्ये चंडिला गडबड करतो. मात्र  या मॅचमध्ये अजित चंडिला अगदी हुशारीने सिग्नल देतो. यावेळी तो  आपलं शर्ट दोनवेळा वर करतो आणि आभाळाकडे पाहतो. त्यामुळे फिक्सर्सना पैसे लावण्यासाठी वेळ मिळतो आणि त्यांच्यसाठीच हाच इशारा असतो.

अंकित चव्हाणकडून मुंबई इंडियन्सविरूद्ध  फिक्सिंग

दोन सामन्यानंतर 13 मे 2013 ला राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये मॅच होणार असते. वानखेडे मैदानावर झालेल्या मॅचमध्ये आधी ठरल्याप्रमाणे अंकित चव्हाण आपल्या ओव्हरमध्ये 13 रन्स देतो. या बदल्यात अंकितला 60 लाख भेटणार असतात. आता दिल्ली पोलिसांजवळ तिन्ही खेळाडूंविरोधातील फिक्सर्ससोबतचे कॉल रेकॉर्ड असतात. त्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी दोन टीम तयार करतात.

श्रीसंतला दोन मुलीसंह अटक

दिल्ली पोलीस मोठ्या ताफ्यासह कारवाईसाठी रवाना होते. एक टीम क्रिकेटर्सना तर दुसरी टीम फिक्सर्सना पकडण्यासाठी सामना संपताच रात्रीच निघते. यामधील एक टीम श्रीसंत राहत असलेल्या मुंबईमधील हॉटेल इंटरकॉन्टिनेंटलमध्ये जाते. श्रीसंतच्या रूममध्ये छापा टाकल्यावर तिथे बुकी जिजु जनार्धन सापडतो. पोलिसांना श्रीसंत आणि बुकी एकाच ठिकाणी सापडतात. दोघांसोबत रूममध्ये दोन मुलीसुद्धा सापडतात. त्यासोबतच 72,000 हजार रूपयांची रोख रक्कम आणि एक डायरी मिळते. ज्यामध्ये इंग्लिश आणि मल्याळम भाषेत काही लिहिलेलं असतं. इतकंच नाहीतर श्रीसंतच्या रूममध्ये कंडोमही सापडतात. पोलीस दोघांनाही ताब्यात घेतात.

अजित आणि अंकित यांना अटक

दिल्ली पोलीस श्रीसंत आणि जिजु जनार्धन यांना घेऊन ट्रायडंट हॉटेलकडे निघतात. त्या हॉटेलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची संपूर्ण टीम असते. दिल्ली पोलीस पहाटे सकाळी ट्रायडंटमध्ये पोहोचतात. राजस्थान रॉयल्स टीमचे सीईओ रघुअय्यर यांना फिक्सिंगविषयी सांगतात. श्रीसंत गाडीमध्ये आहे आणि आता अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना ताब्यात घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यावेळी मीडियामध्ये या ब्रेकिंग बातमीने खळबळ उडाली होती. अनेक उलट सुलट चर्चा सुरू होतात त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे सीईओ आणि टीम मॅनेटमेंट पत्रकार परिषद घेत तिघांविषयी माहिती देतात.

फिक्सिंगबाबत कठोर कायद्यांची गरज

दरम्यान, आयपीएलमधील फिक्सिंग अशा प्रकारे पकडली गेली होती. मात्र फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं. बीसीसीआयने तिन्ही खेळाडूंना बॅन केलं. मात्र आपल्याकडे फिक्सिंगबाबत कोणतेही कठोर कायदे नसल्याने हे खेळाडू बाहेर आले. त्यानंतर टीव्ही शो मध्येही दिसले. भारतामध्ये क्रिकेट म्हणजे एक धर्मासारखं झालं आहे. वेळ पडली तर लोकं देवही पाण्यात ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत. परंतु अशा प्रकारे चाहत्यांच्या भावनांशी खेळलं जात असेल तर संबंधित खेळाडूंवर कठोर कारवाई व्हायला हवी.