मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक परदेशी खेळाडू उपलब्ध नसतील. वेगवेगळ्या संघातील हे खेळाडू आपापल्या देशांच्या मालिकेत व्यस्त आहेत, त्यामुळे काही सामन्यांमध्ये ते खेळू शकणार नाहीत. चेन्नई सुपर किंग्जला (CSK) या बाबतीत फारशी अडचण येणार नाही, पण एमएस धोनीचा संघ आणखी एका कारणामुळे चिंतेत आहे, कारण संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali Visa Issue) सलामीच्या सामन्यात उपलब्ध असणार की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही. इंग्लंडच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला गेल्या 20 दिवसांपासून भारतात येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही, त्यामुळे तो अद्याप भारतात येऊ शकला नसल्याने सीएसकेचं टेन्शन वाढलंय.
बरोबर एक आठवड्यानंतर म्हणजेच 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा मोसम मुंबईत सुरू होत आहे आणि पहिल्याच सामन्यात गतविजेत्या चेन्नईचा सामना गेल्या हंगामातील उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. अशा परिस्थितीत मोईनला अद्याप व्हिसा न मिळणे हे चेन्नईसाठी चिंतेचे कारण बनले आहे. सातत्याने भारतात येत असूनही एवढ्या विलंबामुळे फ्रँचायझीही आश्चर्यचकित झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी शनिवारी 19 मार्च रोजी याबद्दल सांगितले आणि आशा व्यक्त केली की तो स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबईत संघात सामील होऊ शकेल. क्रिकेट वेबसाईट क्रिकबझने विश्वनाथ यांच्या वक्तव्याचा हवाला देत म्हटले आहे, “त्याने (मोईनने) 28 फेब्रुवारीला व्हिसासाठी अर्ज केला होता. त्या अर्जाला 20 दिवस झाले आहेत. तो सतत भारतात येत असतो आणि त्यानंतरही त्याला अद्याप प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. आम्हाला आशा आहे की तो लवकरच संघात सामील होईल.”
विश्वनाथ यांनी असेही सांगितले की बीसीसीआयने देखील या प्रकरणी आपल्या बाजूने प्रयत्न केले आहेत आणि सोमवारपर्यंत हे प्रकरण निकाली निघेल अशी अपेक्षा आहे. “त्याने (मोईन) आम्हाला सांगितले आहे की, प्रवासासाठी कागदपत्रे (व्हिसा) मिळताच तो पुढच्याच फ्लाइटने भारतात येण्यासाठी रवाना होईल. याप्रकरणी बीसीसीआयनेही आम्हाला मदतीचा हात पुढे केला आहे. सोमवारपर्यंत (21 मार्च) त्याला परवानगी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
मोईन अलीला गेल्या वर्षीच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले होते. त्यानंतर, आक्रमक डावखुरा फलंदाज आणि प्रभावी उजव्या हाताचा ऑफ-स्पिनर मोईन अलीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चेन्नईच्या चौथ्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीमुळे फ्रँचायझीने या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला गेल्या मोसमानंतर 8 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले (रिटेन केले) होते.
इतर बातम्या
Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर
IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार