मुंबई : प्रत्येक हंगामाप्रमाणेच आयपीएल 2022 (IPL 2022) मध्येही धावांची स्पर्धा सुरू आहे. यावेळी संघांची संख्याही 8 वरून 10 झाली आहे. म्हणजेच, टक्कर मोठी आणि अधिक तीव्र झाली आहे. केवळ संघांमध्येच नाही, तर खेळाडूंमधील वैयक्तिक विक्रमांसाठीही जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध स्पर्धांपैकी एक म्हणजे सर्वाधिक धावांची शर्यत, म्हणजेच ऑरेंज कॅपसाठीची (IPL Orange Cap) चढाओढ. राजस्थान रॉयल्सचा स्फोटक सलामीवीर जॉस बटलर (Jos Buttler) सध्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर बटलरला त्याच्या जागेवरून कोणीही हलवू हटवू शकलं नाही.
राजस्थानच्या स्टार फलंदाजाने एक दिवस अगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 70 धावा चोपून ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत इशान किशनला मागे टाकत पहिले स्थान पटकावले होते. सध्या त्याच्या नावावर सर्वाधिक 205 धावा आहेत. बटलरने या स्पर्धेत तीन डावात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही 143 इतका आहे. इतकेच नाही तर बटलरने या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक षटकारही लगावले आहेत. या बाबतीत कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलने त्याच्याशी बरोबरी साधली आहे.
मुंबईचा फलंदाज इशान किशनला बटलरला मागे टाकण्याची किंवा त्याच्या जवळ जाण्याची मंगळवारी संधी होती. मोसमातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावणारा इशान चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण तो कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर स्थिरावू शकला नाही. केकेआरविरुद्ध इशानला 21 चेंडूत केवळ 14 धावा करता आल्या. त्यामुळे किशनच्या 3 डावात केवळ 149 धावा झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही तो या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 17 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत.
बटलर आणि इशान किशन यांच्याशिवाय इतर फलंदाजही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. मात्र, ते या दोघांच्या मागे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस 122 धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी या मोसमात पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या तिलक वर्माने कोलकाताविरुद्ध 35 धावांची नाबाद खेळी खेळली आणि त्यामुळे 121 धावांसह तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याशिवाय दीपक हुडा (119) आणि शिमरॉन हेटमायर (109) पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
इतर बातम्या
MI vs KKR kieron pollard: पोलार्ड तात्या अजूनही तितकाच डेंजरस, पाच बॉलमध्ये दाखवून दिलं
KKR vs MI Rohit Sharma: उमेश यादव समोर रोहित शर्मा हतबल, IPL मध्ये आतापर्यंत इतकावेळ घेतला विकेट