मुंबई : आपल्याकडे एक म्हण आहे, ‘तेलही गेले आणि तूपही’, अशीच अवस्था स्ध्या सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) कर्णधार केन विल्यमसनची (Kane Williamson) झाली आहे. एक म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पहिला सामना हरल्याचे दु:ख आणि दुसरे म्हणजे या सामन्यात झालेल्या चुकीची मोठी किंमत त्याला मोजावी लागली आहे. सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनची ही चूक अगदी तशीच होती, जी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात केली होती आणि रोहितने त्याची शिक्षाही भोगली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी केन विल्यमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित शर्माला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचे स्लो ओव्हर रेटचे हे पहिलेच प्रकरण असल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या चूकीची पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड आणि बंदी अशा तरतुदी आहेत.
राजस्थान रॉयल्सने मंगळवारी दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यांनी यंदाच्या सीजनमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 206 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केलं होतं. सनरायजर्स हैदराबादला तशी कामगिरी करुन दाखवणं जमलं नाही. राजस्थान रॉयल्सने त्यांचा 61 धावांनी पराभव केला व आयपीएलमध्ये विजयी शुभांरभ केला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स निर्धारीत 20 षटकात सात बाद 149 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात सरस खेळ दाखवला. सलामीवीर यशस्वी जैसस्वालपासून शिमरन हेटमायरपर्यंत प्रत्येकाचा तडाखेबंद खेळ पहायला मिळाला.
राजस्थान रॉयल्सला सुरुवात चांगली मिळाली. भुवनेश्वर कुमारच्या नो बॉल मुळे जॉस बटलरला बाद असूनही एक संधी मिळाली. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. बटलरने उमरान मलिकच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात 18 धावा काढल्या. तिथून राजस्थानने सामन्यावर जी पकड मिळवली, ती शेवटपर्यंत कायम टिकवली. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 58 धावांची सलामी दिली.
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने हैदराबादच्या गोलंदाजांची जी धुलाई केली, त्याला तोड नाही. बटलरची महत्त्वाची विकेट गेल्यानतंरही त्याने सामन्यात सनरायजर्स हैदराबादला वरचढ होऊ दिले नाही. खेळपट्टीवर आल्यापासून फटेकबाजी सुरु केली. 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. चौकार-षटकारांमधून त्याने 42 धावा केल्या. त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कलनेही हैदराबादच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. फक्त संजूच नाही, दुसऱ्या बाजूने देवदत्तही फटकेबाजी करत होता. एकाचवेळी दोन्ही बाजूंनी हल्लाबोल झाल्याने हैदराबादच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पा भरकटला. त्याने 29 चेंडूत 41 धावा केल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते.
प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्टची जोडी यंदाचं आयपीएल गाजवू शकते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन त्यांनी पहिल्या सहा षटकातच हैदराबादच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं व मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. तिथेच हैदराबादचा पराभव निश्चित झाला. प्रसिद्ध कृष्णाने विलियमसन आणि त्रिपाठीला तंबूत पाठवलं. ट्रेंट बोल्टने पूरनची विकेट काढली. फलंदाजीच नाही राजस्थानची गोलंदाजीही धारदार झाली. ज्या विकेटवर हैदराबादचे गोलंदाज निष्प्भ ठरले. त्याच विकेटवर राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करुन दाखवली. तिथेच सामना राजस्थानच्या बाजूने फिरला.
इतर बातम्या
Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड
RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: RCB पराभवातून उसळी घेईल? आज श्रेयसच्या KKR शी भिडणार