मुंबई : जगभरात हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमधला (IPL) सर्वात यशस्वी खेळाडू आणि यशस्वी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 6 वेळा आयपीएल चषक उंचावला (रोहित 2009 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता) आहे. त्यापैकी 5 वेळा त्याने मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) नेतृत्व करताना आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. रोहित आयपीएलमधील कर्णधार म्हणून दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्याही पुढे आहे. सामन्यादरम्यान त्याचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने काम करतो. खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणे हे त्याचे कौशल्य मानले जाते. रोहित शर्माबद्दल या काही गोष्टी अनेकदा बोलल्या जात होत्या. आणि का बोलणार नाहीत? कर्णधार म्हणून त्याने अनेक विक्रम केले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा दर्जा गगनाला भिडला होता, रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला यशापेक्षा कमी काहीच दिसले नाही. पण आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे आणि रोहित शर्माचे वागणेही बदलले आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्स सारख्या संघाने सलग 6 सामने गमावले आहेत यावर प्रेक्षक विश्वास ठेवू शकत नाहीत. मुंबईने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. आता प्रश्न असा आहे की दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीला त्याच्या नेतृत्वावरुन शिव्या देणारे लोक रोहित शर्माबद्दल काय म्हणतील?
यंदाच्या आयपीएल मोसमात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांचा खेळ संपवला. कोलकाता नाईट रायडर्सनेही बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जनेही मुंबईला हात धुवून घेतले. त्यानंतर शनिवारी लखनौसमोरदेखील रोहितच्या संघाला सहावा पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच इतकी खराब कामगिरी केली असून आता त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य आहे. रोहित शर्मा हा एक सक्षम कर्णधार असला तरी आता अपयशी कर्णधारांच्या एका यादीत त्याने स्थान मिळवले आहे. या यादीत विराट कोहली आणि महेला जयवर्धने यांचीही नावे आहेत.
मुंबई इंडियन्सने या मोसमात सुरुवातीचे सलग 6 सामने गमावले असून अशी परिस्थिती त्यांनी प्रथमच पाहिली आहे. यापूर्वी 2019 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनेही पहिले 6 सामने गमावले होते. तर त्याआधी 2013 मध्ये महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सची देखील अशीच अवस्था होती. दिल्ली आणि बंगळुरूचे संघ पहिले 6 सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिले होते. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या बाबतीतही असेच घडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इतर बातम्या
DC vs RCB IPL Match Result: दिनेश कार्तिकच्या वादळापुढे दिल्ली उद्वस्त, बँगलोरचा चौथा ‘रॉयल’ विजय
DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO