मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफचं गणित आता हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स दिल्लीला 27 धावांनी पराभूत करत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी घेतली. चेन्नईने 20 षटकात 8 गाडी 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे. मात्र दिल्लीचा संघ 140 धावा करू शकला. विजयी धावांचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरुवात झाली. त्याचा फटका धावसंख्येवर बसला. या पराभवासह दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. कारण पुढचे तिन्ही सामने जिंकले तरी नेट रनरेट हवा तसा नाही. त्यात एक सामना चेन्नई आणि दोन सामने पंजाब किंग्ससोबत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेलं 168 धावांचं आव्हान गाठताना खराब सुरुवात झाली. दीपक चाहरच्या दुसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नर बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फिल सॉल्ट 17 धावांवर बाद झाला. त्यामुळे संघावर दबाव वाढला. मिशेल मार्श धावचीत झाला आणि धावांचं अंतर वाढतच गेलं. मनिष पांडे आणि रिली रोसोनं अर्धशतकी भागीदारी केली. पण इतक्या धीम्या गतीने केली त्याला काहीच अर्थ उरला नाही. मनिष पांडे 29 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिली रोस्सोही 35 धावा करून तंबूत परतला.
अक्षर पटेलने फटकेबाजी करत धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 21 धावा करून बाद झाला. रिपल पटेलही धावचीत होत तंबूत परतला, तिथपर्यंत संपूर्ण सामन्यावर चेन्नईची पकड निर्माण झाली होती. अखेर हा सामना चेन्नईने 27 धावांनी जिंकला.
चेन्नई सुपर किंग्सने दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईची पॉवर प्लेमध्ये धीमी सुरुवात झाली. पाचव्या षटकात संघाच्या 42 धावा असताना डेवॉन कॉनव्हे बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड 24 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला मोईन अली काही खास करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करत तंबूत परतला. शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणेला 21 धावांवर ललित यादवने तंबूचा रस्ता दाखवला.
शिवम दुबेने काही मोठे फटके मारत संघाच्या धावांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. पण मिशेल मार्शने त्याला तंबूत पाठवलं. अंबाती रायडू (23, रवींद्र जडेजा (21, महेंद्रसिंह धोनी (20 धावा करून तंबूत परतले. दिल्लीकडून मिशेल मार्शने 3, अक्षर पटेलने 2, कुलदीप यादवने 1, खलील अहमदने 1 आणि ललित यादवने एक गडी बाद केला.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार / विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा