चेन्नई | चेन्नई सुपर किंग्स टीमची आयपीएल 16 व्या मोसमातील आतापर्यंतची सुरुवात ही हवी तशी झालेली नाही. त्यात अनेक खेळाडूंना दुखापत झाली. पराभव, खेळाडूंची दुखापत आणि खेळाडूंची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी या आणि अशा विविध कारणांमुळे टीम मॅनेजमेंटला टेन्शन कमी नाहीये. त्यात काही दिवसांपूर्वी तामिळनाडूत एका आमदाराने टीममध्ये स्थानिक खेळाडू नसल्याचं म्हणत चेन्नईवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विधानसभेत केली होती. चेन्नईच्या मागे एका ना अनेक अडचणी असताना आता टीमला मोठा झटका बसला आहे.
चेन्नईच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत ड्वेन ब्राव्हो, बेन स्टोक्स या आणि यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यात आता आणखी मोठ्या खेळाडूची भर पडली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून चेन्नईचा कर्णधार आणि क्रिकेट चाहत्यांचा गळ्यातील ताईट असलेला महेंद्रसिंह धोनी आहे. चेन्नईचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने धोनीला दुखापत असल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात बुधवारी 12 एप्रिल रोजी सामना पार पडला. चेन्नईचा या सामन्यात शेवटच्या बॉलवर पराभव झाला. यानंतर स्टीफन फ्लेमिंग याने धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली. धोनीला दुखापतीमुळे राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धावताना त्रास जाणवत होता. चेन्नईचा या सामन्यात पराभव तर झालाच. मात्र आता धोनीच्या या दुखापतीने टीम मॅनेजमेंटसह क्रिकेट चाहत्यांचंही टेन्शन वाढलंय.
धोनीला सामन्यादरम्यान धावताना अडचण येत होती. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यानेही धोनीच्या दुखापतीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. धोनीला धावताना पाहून तो धोनी वाटत नाही, जो नेहमी दिसून येतो, असं म्हणत हेडनने धोनीला धावताना त्रास होत असल्याची शंका आपल्या बोलण्यातून व्यक्त केली होती.
आता हेड कोच फ्लेमिंग यानेच धोनीच्या दुखापतीची माहिती दिलीय म्हटल्यावर एकूण टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला धोनी पुढी सामन्यात खेळू शकणार की नाही, असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे धोनी आता खेळणार की नाही, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.
दरम्यान चेन्नई सुपर किंग्स या मोसमातील आपला पुढील सामना हा 17 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. चेन्नईचा हा या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. या सामन्यात चेन्नईने जिंकून तिसरा विजय मिळवावा, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.