मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामातील 12 व्या सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात शनिवारी 8 एप्रिल रोजी पार पडला या सामन्याचं आयोजन हे मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं होतं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. चेन्नईचा हा या मोसमातील 3 सामन्यांमधील सलग दुसरा विजय ठरला. आता चेन्नई 12 एप्रिलला राजस्थान विरुद्ध आपला पुढील सामना खेळणार आहे. त्याआधी चेन्नईच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या 2 खेळाडूंच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट आली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. आता या दुखापतीनंतर दीपक चहर आवश्यक ते उपचार घेणार आहे. दीपकला ज्या ठिकाणी दुखापत झाली त्या ठिकाणी स्कॅन करण्यात येणार आहे. चहरने मुंबई विरुद्धच्या सामन्या एक ओव्हर टाकली होती. मात्र दीपकने त्यानंतर ड्रेसिंग रुमची वाट धरली.
दीपकच्या दुखापतीचं रिपोर्ट आल्यानंतरच त्याची दुखापत किती गंभीर आहे, यावरुन त्याला किती सामन्यांना मुकावं लागेल हे स्पष्ट होईल.
दरम्यान दुसऱ्या बाजूला स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स याच्या पायांच्या बोटाला दुखापत झाली आहे. स्टोक्सला या दुखापतीमुळे मुंबई विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. “स्टोक्सला पायाच्या बोटांना झालेल्या दुखापतीमुळे खेळता आलं नव्हतं”, असं चेन्नईकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता जर स्टोक्स या दुखापतीतून लवकर न सावरल्यास त्याला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आगामी सामन्यालाही मुकावं लागेल.
टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.