मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये सीएसकेने सहज विजय मिळवला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या विजयासह संघाचं जवळपास प्ले ऑफमधील स्थान पक्क केलं आहे. सीएसकेची गाडी मध्ये रुळावरून घसरली असं वाटत होतं मात्र धोनीने आपल्या नेतृत्त्वात परत कमबॅक करत संघाला दुसऱ्या स्थानी पोहोचवलंय. धोनीने आतापर्यंत चारवेळा सीएसकेला कप जिंकून दिला असल्याने त्याला अनुभवाची काही कमी नाही. त्यासोबतच आपल्याकडे असलेल्या खेळाडूंचा वापर कसा करायचा याचं खास कौशल्य धोनीकडे आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू इरफान पठाण यानेही धोनीबाबत एक वक्तव्य केलं आहे.
दिल्लीवरूद्धच्या सामन्यात चेपॉकची खेळपट्टी एकदम संथ होती. मात्र एम एस धोनीने स्पिनर्सचा चांगला वापर केला. स्पिनर्सनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज चांगलेच अडकले. धोनीपेक्षा कोणीही स्पिनर्सना चांगलं मॅनेज करू शकत नसल्याचं म्हणत इरफान पठाण याने धोनीचं कौतुक केलं.
चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यामध्ये वेगवान गोलंदाजांपेक्षा स्पिनर्सने कडक गोलंदाजी केली. सीएसकेच्या सुरूवातीच्या विकेट्स या स्पिनर्सने घेतल्या होत्या. सीएसकेसारखा संघ घरच्या मैदानावर 170 धावांचा पल्ला ओलांडू शकला नाही. त्यानंतर धोनीने सेम पॅटर्न वापरला आणि दिल्लीच्या खेळाडूंना लक्ष्यापासून दूर ठेवलं. या सामन्यात दिल्लीच्या संघाचा 27 धावांनी पराभव झाला होता.
चेन्नईने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. 15 गुणांसह गुणतालिकेत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान