मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने धडक मारली आहे. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम आणखी मजबूत केला आहे. सीएसकेची अंतिम फेरी गाठण्याची ही दहावी वेळ आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चेन्नईने चारवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता पाचव्यांदा नाव कोरण्याची संधी आहे. असं असताना गुजरात टायटन्स विरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात महेंद्रसिंह धोनीची चतुराई दिसून आली. धोनीने पंचांना अशा पद्धतीने गुंतवून ठेवलं की चार मिनिटांचा खेळ खल्लास करून टाकला. याचा अंदाज मैदानातील पंचांना देखील आला नाही. अखेर पंचांना आपला निर्णय मागे घेण्यास भाग पडलं.
चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 7 गडी गमवून 173 धावांचं आव्हान दिलं होतं. 15 षटकापर्यंत गुजरातची 6 गडी बाद 102 अशी अवस्था होती. महेंद्रसिंह धोनीला संघाचं 16 वं षटक इम्पॅक्ट प्लेयर असलेल्या मथीषा पथिरानाला सोपवायचं होतं. या षटकासाठी मथीशा पथिराना मैदानात बोलवलं आणि तो तयारही झाला. पण पंचांनी त्याला नकार दिला. मथीषा आवश्यक वेळेपर्यंत मैदानात उपलब्ध नसल्याचं कारण त्यांनी दिलं.
पंचांच्या मते, कोणता गोलंदाज जर जितका वेळ फिल्डिंगच्या बाहेर असतो तितका वेळ मैदानात घालवल्याशिवाय गोलंदाजी करू शकत नाही. तेव्हा धोनीने विचारलं की, पथिराना किती वेळ बाहेर होता. तेव्हा पंचांनी सांगितलं की चार मिनिटं अजून थांबावं लागेल.
महेंद्रसिंह धोनीने लगेच आपलं डोकं चालवलं आणि पंचांसोबत चर्चा करू लागला. इतक्यात मैदानात असलेले खेळाडू पंचांभोवती जमा झाले. या चर्चेत चार मिनिटांचा खेळ वाया गेला. इतकंच काय तर पथिरानाची वेळही भरून निघाली. पंचांना त्याला गोलंदाजीसाठी परवानगी देण्यास भाग पाडलं.
Dhoni using his presence to full effect, luring the umpires into a 4 minute discussion causing time to run out for Pathirana to bowl after an extended break off the field. Umpires laughing over the incident rather than taking control of the situation is not good enough. #CSKvsGT
— Brad Hogg (@Brad_Hogg) May 24, 2023
मथीशा पथिरानाने 4 षटकात 37 धावा देऊन 2 महत्त्वाचे गडी बाद केले. दुसरीकडे गुजरात टायटन्स 20 षटकात 157 धावा करू शकला. चेन्नईने गुजरातला 15 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. आता गुजरात क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई विरुद्ध लखनऊ या सामन्यातील विजेत्याशी लढणार आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नलकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन | एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश थेक्षाना.