मुंबई : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलमधील फायनल सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांपैकी जो विजयी होईल त्यानंतर आयपीएलमधील मोठा विक्रम रचला जाणार आहे. गुजरात संघ सलग दुसऱ्यांदा तर चेन्नई सर्वाधिक पाचवेळा चॅम्पिअन असणाऱ्या मुंबई इंडिअन्सच्या विक्रमाशी बरोबरी करणार आहेत. यासह गुजरातचा स्टार खेळाडू शुबमन गिलला थेट किंग विराट कोहली याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात शुभमन गिल स्टार फलंदाज विराट कोहलीचा एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकतो. गिलने 16 सामन्यात 851 धावा केल्या आहेत. गेल्या चार सामन्यांत त्याने तीन शतके मारली आहेत. फायनलमध्येही चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शतक केलं तर तो विराट कोहली आणि जोस बटलरच्या एका मोसमात सर्वाधिक शतके करणाऱ्या क्लबमध्ये सामील होईल.
शुभमन गिलला विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट कोहली आयपीएल 2016 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता, त्याने 16 सामन्यांमध्ये चार शतकांच्या मदतीने 973 धावा केल्या, जे एका हंगामात एका खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 16 सामन्यात 60.79 च्या सरासरीने आणि 156.43 च्या स्ट्राईक रेटने 851 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या 16 व्या मोसमात त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्यासाठी शुभमन गिलला १२३ धावांची गरज आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याची बॅट चाललेली दिसली आहे. गिलने या मैदानावर 11 टी-20 सामन्यांमध्ये 70.00 च्या सरासरीने आणि 157.50 च्या स्ट्राइक रेटने 630 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्याच्या 60 चेंडूत 129 धावांच्या स्फोटक खेळीने चेन्नईला सावध केलं असावं.