मुंबई | चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 16 व्या मोसमाची चॅम्पियन ठरली. सीएसकेने आयपीएल 16 व्या हंगामातील महाअंतिम सामन्यातडकवर्थ लुईस नियमानुसार गुजरात टायटन्सवर 5 विकेट्स विजय मिळवला. चेन्नईला पावसामुळे 15 ओव्हरमध्ये सुधारित 171 धावांचं आव्हान मिळालं. चेन्नईने हे आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण करत सनसनाटी विजय मिळवला. चेन्नईला शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. तेव्हा रविंद्र जडेजाने सिक्स आणि फोर ठोकून चेन्नईला थरारक विजय मिळवून दिला.
चेन्नई यासह पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली. चेन्नईने मुंबईच्या 5 ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच या ऐतिहासिक विजयानंतर चेन्नईच्या स्टार खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.या बॅट्समनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांनी एकूण प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या खेळाडूची यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची 6 वी वेळ होती. या खेळाडूने मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांकडून प्रत्येकी 3-3 वेळा ट्रॉफी जिंकला आहे.
हा खेळाडू चेन्नईकडून खेळण्याआधी मुंबईकडून खेळायचा. मुंबईने 2013,2015 आणि 2017 या सालीही आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा हा खेळाडू मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्यानंतर 2018 मध्ये हा सामील झाला. चेन्नईने 2018, 2021 आणि 2023 ला ट्रॉफी जिंकली. अशा प्रकारे या क्रिकेटरने एक खेळाडू म्हणून सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही केलाय.
गुजरातवर चित्तथरारक विजयानंतर चेन्नई टीमने जल्लोष करताना आधी या खेळाडूला ट्रॉफी दिली. तेव्हा या खेळाडूला भावना अनावर झाल्या. खेळाडूला रडू कोसळलं. हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. वास्तवात मी भाग्यवान आहे की मी या महान टीमकडून खेळलो, असं या क्रिकेटरने म्हटलं.
चेन्नईचा स्टार अंबाती रायुडू याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय. खरंतर अंतिम सामन्याआधीच रायुडूने रिटायरमेंटबाबत जाहीर केलं होतं. मात्र अशाप्रकारे रायुडूला विजयी निरोप मिळेल, असं कुणी विचारही केला नसेल. सोशल मीडियावरही सेंडऑफ असावा तर असा, असं म्हणत रायुडूच्या निवृ्त्ततीवरुन प्रतिक्रिया उमटत आहेत.
रायुडूनेही या अंतिम सामन्यात छोटी पण इमपॅक्ट पाडणारी खेळी केली. रायुडूने निर्णायक क्षणी फक्त 8 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 कडक सिक्सच्या मदतीने 19 धावांची खेळी केली. या खेळीमुळे खऱ्या अर्थाने सामना हा चेन्नईच्या बाजूने झुकला.
दरम्यान रायुडूने आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सांगता करताना ट्विटद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. रायुडूने बीसीसीआय आणि त्या अंतर्गत येणारे क्रिकेट बोर्ड, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, महेंद्रसिंह धोनी, सहकारी आणि कुटुंबियांचे आभार मामनले आहेत.
“मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होतोय. मी बीसीसीआय, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, बडोदा क्रिकेट असोसिएशन, आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा आभारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिलीत यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे”, अशा शब्दात रायुडूने क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.
“मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीची सांगता सहा वेळेचा आयपीएल चॅम्पियन म्हणून करतोय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.चेन्नई आणि टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून महेंद्रसिंह धोनी याच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो. धोनीसोबत गेल्या 2 दशकातल्या ऑफ आणि ऑन फिल्ड अशा अविस्मरणीय आठवणी आहेत. त्या आठवणी कायम मनात रुंजी घालतील”, असं रायुडूने म्हटलंय.
“मला माझ्या कुटुंबियांच्या पाठिंब्याशिवाय मला इथपर्यंत निश्चितच पोहचता आलं नसतं. विशेष करुन माझे वडील संबासिवा राव यांच्यापाठिंब्याशिवाय तर शक्यच नव्हतं”, अशा शब्दात रायुडूने आपल्या कुटुंबियाचंही आपल्या कारकीर्दीत असलेलं योगदान ठळकपणे नमूद केलं.
— ATR (@RayuduAmbati) May 30, 2023
तसेच रायुडूने शेवटीशेवटी सहकारी, सपोर्ट स्टाफ, कोच आणि क्रिकेट चाहत्यांचा उल्लेख करत जाहीर आभार मानले आहेत. ” मी संघ सहकारी, सपोर्ट स्टाफ, कोच आणि चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तुमच्याशिवाय माझा प्रवास कधीही पूर्ण होऊ शकला नसता. माझ्या कारकीर्दीतील चढ आणि उतारात कायम सोबत राहिलात आणि पाठिंबा देत राहिलात, यासाठी मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे”, असं म्हणत रायुडूने मनोगतचं समारोप केलं.
अंबाती रायुडूने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील 203 सामन्यांमध्ये 28.05 च्या सरासरीने 4 हजार 348 धावा केल्या. यामध्ये 1 शतकासह 22 अर्धशतकांचाही समावेश होता. रायुडू बॅट्समन, फिल्डर आणि एक उमदा विकेटकीपर सुद्धा होता. आता निवृत्तीनंतर रायुडू कशाप्रकारे आपल्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष नक्कीच असेल.