अहमदाबाद | भारतीयाचं क्रिकेट वेड हे जगजाहीर आहे. क्रिकेट धर्म असेल तर महेंद्रसिंह धोनी हा काही क्रिकेटचाहत्यांसाठी देव आहे. यावरुन चाहत्यांमध्ये धोनीबाबत असलेला आदर आणि सन्मान स्पष्ट होतो. धोनीचा हा आयपीएलमधील अखेरचा सामना असू शकतो, असं समजून चाहते आले. चाहत्यांनी जीवाची बाजी लावून फायनलची तिकीट मिळवली. मात्र रविवारी 28 मे रोजी पावसामुळे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना होऊ शकला नाही. त्यामुळे 29 मे रोजी राखीव दिवशी हा महामुकाबला होणार आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या पावसामुळे क्रिकेट चाहत्यांची तारांबळ उडाली. ज्याला जिथे मिळेल तिथे आडोशाला उभा राहिला. पावसामुळे मुख्य दिवशी सामना झाला नाही. मात्र धोनी चाहते हताश झाले नाहीत. अंतिम सामना पाहूनच जाणार आणि धोनीला ट्रॉफी उचलताना पाहल्याशिवाय जाणार नाहीत, अशी शपथच हे चाहते घेऊन आलेले.
पाऊस झाला म्हणून या चाहत्यांनी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरच रात्र काढली. चाहते जिथे जागा मिळेल तिथे झोपले. धोनी चाहत्यांच्या या स्थितीचा व्हीडिओ एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. या तरुणाने अहमदाबाद स्टेशनवरील क्रिकेट चाहत्यांना फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.
सुमीत खरात या तरुणाने अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरील सीएसके चाहत्यांची पावसामुळे झालेली स्थिती कॅमेऱ्यात कैद केलीय. या तरुणाने ट्विटमध्ये लिहिलंय की “मी रात्री 3 वाजता अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर गेलो, तेव्हा मला सीएसकेची जर्सी घातलेले अनेक चाहते दिसले. यापैकी काही जण झोपलेले होते. तर काही जण जागे होते. मी काहींना विचारलं की तुम्ही इथे काय करत आहात? यावर आम्ही फक्त धोनीला पाहण्यासाठी आलो”.
कशासाठी? धोनीसाठी
It is 3 o'clock in the night when I went to Ahmedabad railway station, I saw people wearing jersey of csk team, some were sleeping, some were awake, some people, I asked them what they are doing, they said we have come only to see MS Dhoni @IPL @ChennaiIPL #IPLFinal #Ahmedabad pic.twitter.com/ZJktgGcv8U
— Sumit kharat (@sumitkharat65) May 28, 2023
दरम्यान धोनी चाहत्यांची ही स्थिती पाहून काही जणांनी संतापही व्यक्त केलाय. नरेंद्र मोदी स्टेडियम प्रशासननाने सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची झोपण्याची व्यवस्था करायला हवी होती. चाहत्यांना असं वाऱ्यावर सोडून देणं योग्य नाही, असं म्हणत अनेकांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. आता राखीव दिवसावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे राखीव दिवशीतरी महामुकाबला होतो की पाऊस पुन्हा जोरदार बॅटिंग करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष लागून राहिलंय.