मुंबई : आयपीएलच्या फायनल 2023 सामन्यामध्ये गुजरात टायटन्स संघाचा खेळाडू साई सुदर्शन याने 96 धावांची धमाकेदार खेळी केली होती. साई सुदर्शन याच्या खेळीच्या जोरावर गुजरात संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडला होता. पावसामुळे गुजरातचं आव्हान 170 केलं आणि याचाच फटका संघाला बसला. मात्र या युवा खेळाडूमुळे यंदाच्या पर्वात गुजरातसाठी अनेक उपयुक्त खेळी केल्या. केन विल्यमसन याला दुखापत झाल्याने साईला संधी मिळाली होती, याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. फायनलमधील खेळीनंतर केनने त्याला फोन केल्याचं साई सुदर्शन याने सांगितलं.
मला केनचा फोन आला होता त्यावेळी, तू केलेल्या खेळीने मला आनंद झाला आहे. संघासाठी दमदार खेळी केली असल्याचं केन म्हणाल्याचं साईने सांगितलं. मला केनच्या जागेवर खेळण्याची संधी मिळाली होती आणि मी ती भूमिका माझ्या परीने निभावण्याचा प्रयत्न केला. कारण मला संधी देण्याआधी मला कशाप्रकारे खेळत डाव सावरायचा आहे, याबाबत सांगण्यात आलं होतं.
केन माझ्याशी न्युझीलंडला गेल्यावरही फोनवर बोलत होता. खेळाडूच नाहीतप माणूस म्हणूनही तो चांगला आहे. त्याने स्वतः मला मेसेज केला की मी त्याला कधीही कॉल करू शकतो आणि क्रिकेटबद्दल काहीही विचारू शकतो असं बोलल्याचं साई सुदर्शन म्हणाला.
दरम्यान, IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फक्त 47 चेंडूत 96 धावांची शानदार खेळी केली होती. मात्र, त्याची खेळी संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकली नाही. सुदर्शनच्या कामगिरीचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे. IPL 2023 मध्ये त्याने गुजरातसाठी फक्त 8 सामने खेळले आणि या दरम्यान त्याने 51.71 च्या सरासरीने आणि 141.41 च्या स्ट्राइक रेटने 362 धावा केल्या होत्या.